नाशिक (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात डिजिटल शिक्षण विद्याशाखेतर्फे महत्त्वाकांक्षी 'महाज्ञानदीप' प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात एक दिवसीय समन्वय बैठक संपन्न झाली. राज्यातील सर्व विद्यापीठांमधील नोडल अधिकारी सहभागी असलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुक्त विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
बैठकीच्या अध्यक्ष पदावरून बोलतांना मा. कुलगुरू सोनवणे म्हणाले की ऑनलाईन शिक्षणात महाराष्ट्र पुढे जावा या हेतूने राज्य शासनाच्या सहकार्याने ‘महाज्ञानदीप’ हा शैक्षणिक प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना कोणते शिक्षक्रम हवे आहेत त्यानुसार प्रामुख्याने रोजगारनिर्मितीक्षम व गुणवत्तापूर्ण शिक्षणक्रम निर्माण करण्याची गरज आहे. त्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा नेमका वापर करायला हवा, राज्यातील प्रत्येक विद्यापीठात महाज्ञानदीपचे जाळे निर्माण व्हायला हवे, त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाने एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून एक सल्लागार समिती नेमायला हवी यावर त्यांनी जोर दिला. बैठकीत भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित जेनेरिक शिक्षणक्रम, आगामी काळात उपलब्ध करावयाचे शिक्षणक्रम, त्यांची रूपरेषा, त्यांची ऑनलाईन उपलब्धता, क्रेडीट संख्या आदीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच 'महाज्ञानदीप' प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी विद्यापीठाच्या डिजिटल शिक्षण विद्याशाखेच्या संचालिका इमरटस प्रा. कविता साळुंके, प्रा. गणेश लोखंडे, प्रा. समीर सहस्त्रबुद्धे (ऑनलाईन) यांच्यासह विविध विद्यापीठांचे नोडल अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते. प्रास्ताविक शैक्षणिक संयोजक श्री. सचिन पोरे यांनी केले.
चौकट : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शीर्ष नेतृत्वाखाली महाज्ञानदीप प्रकल्पात मुंबई विद्यापीठ,मुंबई, सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, कोल्हापूर विद्यापीठ, कोल्हापूर व एसएनडीटी विद्यापीठ मुंबई अशा प्रमुख पाच विद्यापीठांचे प्रमुख सक्रिय योगदान आहे. उर्वरित विद्यापीठांचे देखील शिक्षणक्रम निर्मिती – विकसन साठी सहकार्य घेण्यात येत आहे. राज्यातील उच्च शिक्षणात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.