ठाणे,दि.06 :- भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आणि 15 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या जनजाती गौरव दिनाच्या अनुषंगाने आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ.अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथे एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा पार पडली. यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ.उईके यांनी जनजाती समाजाच्या गौरवशाली इतिहासाची जाणीव सर्वांना होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे युवा कार्यप्रमुख वैभव सुरुंगे, अपर आयुक्त गोपीचंद कदम, शहापूर प्रकल्प अधिकारी राजेंद्र हिवाळे, मुंबई विद्यापीठाचे डॉ.रमेश गावीत आणि मंत्रालय मुंबई येथील ललित वराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गौरवशाली इतिहासाची जनजागृती आवश्यक
मंत्री डॉ.उईके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती आणि जनजाती गौरव दिन साजरा केला जात आहे. समाजात जनजाती समाजाबद्दल प्रेम, विश्वास आणि सन्मान निर्माण होणे आवश्यक आहे. राणी दुर्गावती, राघोजी भांगरे आणि वीर बाबूराव यांच्यासारख्या अनेक क्रांतीवीरांनी देशासाठी केलेल्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. आदिवासी विकास विभाग या वर्षात जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आहे.
महिला सबलीकरण आणि विद्यार्थ्यांना मदत
यावेळी त्यांनी आगामी योजनांची माहिती दिली. दि.9 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील आदिवासी महिलांसाठी 'राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण व सक्षमीकरण योजना' सुरू करण्यात येणार आहे. या योजनेतून महिला बचतगटांना कर्ज आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर, 'पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना' अंतर्गत वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या 11 वी ते पदवीधर विद्यार्थ्यांना प्रतिमहिना 5 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
प्रदर्शनाचे आयोजन
दि.10 ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीत नागपूर येथे मोठे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. यात देशातील विविध मान्यवर आदिवासी नेते, समाजसेवक, साहित्यिक आणि इतिहासकार यांना एकत्र आणून त्यांच्या ज्ञानाचा लाभ घेतला जाईल. महाराष्ट्रातील 45 जनजातींच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शनही भरवले जाईल, जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आपली संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान वाटेल.
प्रमुख वक्ते अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे युवा कार्यप्रमुख वैभव सुरुंगे यांनीही आपल्या भाषणात जनजाती समाजातील विविध क्रांतिकारकांचा इतिहास आणि त्यांच्या योगदानाबद्दल सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाची प्रस्तावना संचालक डॉ.प्रकाश म्हसरानन यांनी केली. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमात लव्हाळी आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले, ज्याचे मंत्र्यांनी विशेष कौतुक केले.