नवी मुंबई : महाराष्ट्र शासन निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार माहे सप्टेंबर महिन्याचा लोकशाही दिन दि. 1 सप्टेंबर 2025 रोजी होणार असून अर्जदारांनी विहित नमुन्यात आपला अर्ज दोन प्रतींमध्ये दि. 18 ऑगस्ट 2025 पर्यंत मा.आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे नावे 'लोकशाही दिनाकरीता अर्ज' असे दर्शनी भागी ठळकपणे नमूद करुन सादर करावयाचा आहे.
लोकशाही दिनाकरीता करावयाच्या अर्जाचा विहित नमुना नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाच्या (Website) मुख्यपृष्ठावर जलद दुवे (Quick Links) आयकॉनवर उपलब्ध असून सदर अर्ज नमुना प्रत सहजपणे डाऊनलोड करुन घेता येऊ शकते. तसेच महानगरपालिका मुख्यालय इमारत, माहिती व जनसंपर्क विभाग, तिसरा मजला, से.15 ए, किल्ले गांवठाण जवळ, सी.बी.डी., बेलापूर येथूनही नागरिक अर्ज नमुना प्रत विनामूल्य उपलब्ध करून घेऊ शकतात.
अर्ज करताना नागरिकांनी शासन निर्णयानुसार अर्जात नमूद तक्रार / निवेदन हे वैयक्तिक स्वरुपाचे असावे याची दखल घ्यावयाची आहे. तसेच अर्ज एकाच विभागाशी संबंधित एकाच विषयाबाबत असावा. अर्जदाराने लोकशाही दिनात अर्ज दाखल करण्यापूर्वी संबंधित विषयाबाबत विभाग कार्यालय, विभागप्रमुख स्तरावर निवेदन सादर केलेले असावे व त्याच्या प्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक असेल. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/ अपिल, सेवाविषयक - आस्थापना विषयक बाबी याबाबतचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावयाची आहे.
विहित नमुन्यात नसणारे व अर्जासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तसेच तक्रार / निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर त्याचप्रमाणे यापूर्वीच अंतिम उत्तर दिलेले आहे / देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत याचीही नागरिकांनी नोंद घ्यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.