ठाणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत दि. ०२ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत आज, दि. १४ ऑगस्ट रोजी तिरंगा सन्मान शपथ कार्यक्रम मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या वेळी रोहन घुगे म्हणाले, “तिरंगा हा आपल्या स्वातंत्र्याचा, अभिमानाचा आणि एकतेचा प्रतीक आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे म्हणजे आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहणे आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीची शपथ घेणे होय. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे. तिरंगा फडकवण्याबाबत शासनाने दिलेल्या नियमाचे पालन देखील जबाबदार नागरिक म्हणून करावे.”
शपथविधी दरम्यान अधिकारी व कर्मचारी यांनी- “मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वातंत्र्यसैनिक व वीर हुतात्मे यांच्या बलिदानाचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन” अशी शपथ घेतली.
कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील, डॉ. किर्ती डोईफोडे यांसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, शाळा, संस्था व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानात सहभागी होऊन तिरंग्याचा मान वाढवावा आणि स्वातंत्र्यदिनाचा आनंद उत्साहात साजरा करावा.