ठाणे ( विनोद वास्कर ) : ठाण्यात दहीहंडी उत्सवाचा मोठा जल्लोष पाहायला मिळत आहे.ठाण्यात अनेक प्रसिद्ध आणि मानाच्या दहीहंड्यांची दरवर्षी चांगलीच चर्चा असते. ठाण्यातील प्रतिष्ठेच्या दहीहंड्या फोडण्यासाठी जय जवान गोविंदा पथक हजेरी लावून आपल्या नावावर विक्रम करण्याच्या तयारीत असते मात्र यंदा जय जवान गोविंदा पथकाचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्यात आल्याचे पाहायला मिळालंय. आज ठाण्यातील संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात मुंबईतील जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाने तब्बल १० थर रचून विश्वविक्रम केला आहे. यापूर्वी मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाचा ९ थरांचा विक्रम होता. तो कोकण नगरच्या संघाने मोडीत काढला आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून कोकण नगर गोविंदा पथक १० थरांचा सराव करत असल्याची माहिती मिळतेय. तर यापूर्वी २०२२ मध्ये कोकण नगर गोविंदा पथकाने ९ थारांचा विक्रम याच ठिकाणी केला होता. यावर्षी त्यांनी जिद्द आणि कठोर मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर १० थर रचून यंदा आपले स्वप्न पूर्ण केले.
ठाण्याला दहीहंडीची पंढरी म्हणून ओळखली जाते जोगेश्वरी चा कोकण नगर गोविंदा पथकाने यंदा १० मानवी मनोरे रचून जय जवान गोविंदा पथकाचा विक्रम मोडीत काढला आहे . मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडीत हा अनोखा विक्रम घडला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विक्रमावर आनंद व्यक्त करत कोकण नगर गोविंदा पथकला २५ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले आहे. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा गजर करत त्यांचे अभिवादन केले. त्यानंतर सोशल मीडियावर विक्रमाचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.
कोकण नगर पथक आहे तरी कुठलं ?
जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचे प्रशिक्षक विवेरक कोचरेकर आहेत. मागील १२ वर्षापासून ते गोविंदा पथकाला प्रशिक्षण देत आहेत. कोकण नगर गोविंदा पथक हे सर्वात जुने पथक आहे. अतिशय शिस्तबद्धपणे मानवी मनोरे रचनासाठी ओळखले जाते. सर्वात प्रथम नऊ थर लावण्याचा विक्रम देखील २०२२ साली कोकण नगर पथकाने केला होता.अखेर आज त्यांनी आज विश्वविक्रम करत १० थर लावले.
तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा गोविंदा रे, गोविंदा आला रे. ..आला, जरा मटकी सांभाल...., गो...गो गोविंदा, चांदी की डाल पे सोने का मोर, मज गया शोर सारी नगरी मे..... अशा गाण्यांचा ठेका धरत आणि काळजाचा ठोका चुकवेल असा थरार याची देही याची डोळा असा दहीहंडीचा उत्सव महाराष्ट्रवासीयांनी अनुभवला. .. गोविंदाच्या अजोड जिद्दीचा अद्भुत नजारा पाहून सर्वजण थक्क झाले. कुठे ८ तर लागले तर कुठे ९ थर असा अद्भुत उत्सव मुंबई सह राज्यभरात मोठ्या जल्लोषात साजरा झाला आहे. बॉलीवूडच्या स्टार मंडळींनी गोविंदाला पोस्थान देण्यासाठी विशेष हजेरी लावली.