ठाणे – स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने जिल्ह्यात “हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला आहे. ‘स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग’ या टॅगलाइनखाली सांस्कृतिक मंत्रालय, पेयजल व स्वच्छता विभाग आणि राज्य पाणी व स्वच्छता मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आणि प्रकल्प संचालक पंडित राठोड यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. मोहिमेत सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, जलकुंभ, पाणीपुरवठा सुविधा तसेच स्वच्छता घटकांचे सुशोभीकरण यावर भर दिला जाणार आहे. गावागावात विद्यार्थी व युवक स्वच्छता रॅली काढतील, तसेच घराघरात रांगोळ्या आणि सजावट करून स्वच्छतेचा संदेश दिला जाईल.
मोहिमेची उद्दिष्टे
• लोकसहभागातून राष्ट्रीय अभिमान आणि स्वच्छतेची भावना वृद्धिंगत करणे.
• शाश्वत पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य यासाठी आवश्यक उपक्रम राबविणे.
• नागरिक व विद्यार्थ्यांकडून ‘स्वच्छ सुजल गाव’ प्रतिज्ञा घेणे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
• १२ ऑगस्ट: जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टाक्या, नळजोडण्या, पंप हाऊस यांची स्वच्छता व सुशोभीकरण.
• १३ ऑगस्ट: कचरा व्यवस्थापन, शौचालय देखभाल, जलसंधारण व प्लास्टिक टाळण्याबाबत जनजागृती.
• १४ ऑगस्ट: गावातील सार्वजनिक ठिकाणांची अंतिम स्वच्छता व सजावट.
• १५ ऑगस्ट: स्वच्छता चॅम्पियन आणि स्वयंसेवकांचा सत्कार.
या कालावधीत नाल्यांची स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, पाण्याची गळती शोधून थांबवणे, सार्वजनिक शौचालये, घनकचरा व प्लास्टिक व्यवस्थापन केंद्रांची स्वच्छता यासारखे उपक्रम हाती घेण्यात येतील.