दिवा : दिव्याच्या मध्यवर्ती भागातील दिवा चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असावे अशी गेली कित्येक वर्षे असंख्य शिवप्रेमींची इच्छा होती. पण यावर प्रशासकीय आणि राजकीय स्तरावरून नेहमीच उदासीन भूमिका घेतली गेली.
दिवा चौकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज या नावाने असावे यासाठी शिवभक्त प्रकाश दत्ता पाटील यांनी पुढाकार घेत रविवार, दिनांक १० ऑगस्ट रोजी या चौकाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करण्याचे जाहीर केले होते. यासाठी त्यांनी दिव्यातील सर्व नागरिकांना, शिवजयंती उत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांना या नामांतर सोहळ्यात एक सर्व राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एक शिवभक्त म्हणून सामील होण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार आज सकाळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात दिवा चौकात गर्दी केली होती. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या सोहळ्याला हजेरी लावली यात मनसेचे तुषार पाटील, शिवसेना उबाठाच्या ज्योती पाटील, भाजपचे सचिन भोईर, आर पी आय चे दिनेश पाटील, सौरभ अंढागळे, दिवा व्यापारी संघटनेचे चेतन पाटील विविध सामाजिक संघटनांचे बालाजी कदम,प्रकाश पाटील, राहुल खैरे, शैलेश पवार उपस्थित होते.
शिवरायांच्या वेशभूषेतील रमेश शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. शिवरायांच्या नावाने करण्यात आलेल्या चौकाच्या नामकरणाने दिवेकर नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.