अंबरनाथ : अंबरनाथ मधील शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यावर शिवसेना शहर शाखेत झालेल्या गोळीबार हल्ल्यातील फरार आरोपी तब्बल १४ वर्षानंतर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. ठाणे गुडे शाखेच्या टीमने ही कामगिरी केली आहे. भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (५१ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला गुजरात च्या सुरत मधून अटक केली आहे.
अरविंद वाळेकर हे २३ नोव्हेंबर २०११ रोजी रात्रौ सुमारे साडेआठ वाजेच्या सुमारास शहराच्या पूर्व भागातील शिवसेना शहर शाखेत आले असता, तेथे त्यांचा खाजगी अंगरक्षक व ड्रायव्हर शाखेच्या बाहेर थांबले. पक्षा संदर्भात वर्चा सुरू असतांना दोन इसम शाखे मध्ये आले व त्यांनी रिव्हॉल्व्हर मधुन फायरींग सुरू केली. तेव्हा वाळेकर यांचा अंगरक्षक शाम सुंदर यादव यास गोळी लागल्याने तो मयत झाला होता. त्यानंतर वाळेकर यांचा दुसरा अंगरक्षक राकेश यादव याने त्याचे जवळील लायसन्स धारी रिव्हॉल्व्हरने वाळेकर यांचेवर फायरींग करणारा आरोपीवर फायरींग केल्याने तो आरोपी शिवसेना शाखेच्या बाजुला पायरीजवळ खाली पडला.
या गुन्हयात बबुसिंग उर्फ नंदलाल शहा, ब्रिजेश हर्ष बहादुर सिंग, प्रदिप जावरेकर, राजेश सिंह उर्फ गोरखनाथ सिंह या आरोपींना अटक करण्यात आलेली होती. तसेच मनिष कुमार उर्फ बबलु मदनलाल झा-शर्मा हा फिर्यादी यांचे अंगरक्षक कडुन स्वः संरक्षणार्थ झालेल्या गोळीबारात मयत झाला होता. परंतु या गुन्हयात फरार असलेला आरोपी भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला (५१) हा अटक चुकविण्यासाठी लपुन राहत होता. खुना सारख्या गंभीर गुन्हया मधील आरोपी हा सुमारे १४ वर्षापासून पोलीसांना गुंगारा देवून वेगवेगळया ठिकाणी आपले अस्तित्व लपवून राहत होता, या गुन्हयाचा मध्यवर्ती गुन्हे शोध कक्षाकडून समांतर तपास चालु असतांना पोलीस हवालदार दादासाहेब पाटील यांना सदर आरोपीताविरूध्द दाखल असलेल्या गुन्हयाची माहिती काढून वेगवेगळया राज्यातून मोबाईल क्रमांक प्राप्त करून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी हा पलसाना, सुरत, गुजरात येथे असलेबाबत तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदार यांचेकडून माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे वरिष्ठांची परवानगी घेवून पोलीस पथक गुजरात येथे रवाना केले होते.
मध्यवर्ती गुन्हे शोध कक्ष, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे पोलीस पथकाने या गुन्हयातील फरार आरोपी भैय्याजी उर्फ राजेश रामशिरोमणी शुक्ला याला अटक केली आहे.