युनिसेफ इंडिया आणि पत्रसूचना कार्यालयातर्फे कार्यशाळेचे आयोजन
मुंबई, दि. १५ : बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजाराची (एनसीडी) समस्या दूर करण्यासाठी वैद्यकीय केंद्रांचा विस्तार, औषधांची उपलब्धता आणि शाळांच्या माध्यमातून मिळणारा पाठिंबा अधिक मजबूत करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केले.
युनिसेफ इंडिया आणि पत्रसूचना कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मुंबईत “बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार (एनसीडी)” या विषयावर हॉटेल ताज प्रेसिडेंट मुंबई येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यात वाढत्या संख्येने आढळणाऱ्या बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजाराच्या स्थितीसंबंधी महत्त्वाचे विचार आणि या आजारांना परिणामकारक पद्धतीने प्रतिबंध करून त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या धोरणांबाबत विचारविनिमय करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राज्य शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक म्हणाले, लहान मुलांना दिली जाणारी एनसीडी उपचारसेवा मजबूत करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे. शाळांमध्ये केली जाणारी तपासणी वाढवणे, अत्यावश्यक औषधे सर्वांना मिळतील याची खबरदारी घेणे आणि जिल्हा स्तरावरील उपचार सुविधांमध्ये सुधारणा आमचे तातडीचे प्राधान्य आहे.” प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भावस्थेपासूनच काळजी घेतली गेली तर अशा आजारांना प्रतिबंध केला जाऊ शकतो असे सांगून डॉ. निपुण विनायक म्हणाले, “समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत, विशेषतः दुर्लक्षित वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकत्रितरित्या काम करण्याची गरज आहे.
यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय महासंचालक स्मिता वत्स शर्मा म्हणाल्या, “बाल्यावस्थेतील एनसीडी म्हणजे केवळ आरोग्यविषयक समस्या नव्हेत. हे आजार शिक्षण, कुटुंबाचे उत्पन्न तसेच मानसिक स्वास्थ्यावरदेखील परिणाम करतात. योग्य काळजी घेऊन दूर करता येऊ शकणाऱ्या आजारांसाठी कोणत्याही बालकाची शाळेत अनुपस्थिती होता कामा नये अथवा त्या बालकाला एकटेपणा जाणवावा लागू नये. राज्यातील लहान मुलांचे आरोग्य त्या राज्याचे भविष्य निश्चित करते.
युनिसेफच्या महाराष्ट्र शाखेचे प्रमुख संजय सिंग म्हणाले, बालपणातील एनसीडी सध्याच्या काळातली सगळ्यात जोखमीची, पण फारशी माहिती नसलेली आव्हाने दर्शवतात. एनसीडी म्हणजे अदृश्य साथ असून या आजारांचे वेळेत निदान होण्यावर भर देऊन महाराष्ट्राने सुरू केलेली मोहीम आणि सर्वसमावेशक उपचार पद्धती हे देशाच्या उर्वरित भागासाठी उत्तम उदाहरण आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील प्रत्येक बालकाला निरोगी, परिपूर्ण जीवनाची हमी देण्याच्या, महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होण्याची संधी युनिसेफला मिळाली. या आजारांचा प्रभाव रुग्णालयांपुरता मर्यादित राहात नाही. अशा मुलांच्या कुटुंबीयांना वाढता उपचार खर्च, जिल्हा आरोग्य केंद्रात वारंवार जाणे तसेच मुलांना शाळेत आणि समाजात वावरताना येणाऱ्या समस्या या सगळ्याचा सामना करावा लागतो अशी माहिती त्यांनी दिली. नागपूरच्या एम्स रुग्णालयाने युनिसेफच्या मदतीने बालपणातील एनसीडीज साठी दवाखाना सुरू केला आहे. येथे दर आठवड्याला गंभीर आजाराला सामोरे जाणाऱ्या रुग्णालयाबाहेरच्या मुलांवर उपचार केले जातात असेही श्री. सिंग यांनी सांगितले. बालवयातील एनसीडी उपचारांचा राष्ट्रीय एनसीडी प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमात समावेश करण्यासाठी राज्याचा आरोग्य विभागही प्रयत्न करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
एम्सचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, एम्स नागपूर, युनिसेफ आणि महाराष्ट्र सरकार यांच्यातील सहकार्यामुळे आम्हाला केवळ उपचारांपलीकडे जाऊन; आजार झालेली मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत लवकर पोहोचणे, त्यांना आरोग्यदायी सवयी लावणे आणि बालवयातल्या गंभीर आजाराचे दडपण कमी करणे अशा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देता आला. महाराष्ट्र सरकार आणि युनिसेफच्या मदतीने प्रत्येक मुलाला आरोग्यपूर्ण आणि समृद्ध वाढीची संधी मिळेल याची हमी देण्यासाठी एम्स नागपूर वचनबद्ध आहे.
गटचर्चेत आरोग्यसेवा तज्ज्ञांनी बालपणीच्या एनसीडींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी शालेय आरोग्य तपासणी मजबूत करणे, इन्सुलिन आणि इनहेलरसारख्या आवश्यक औषधांची मोफत उपलब्धता करून देणे, जिल्हास्तरीय एनसीडी क्लिनिक स्थापन करणे आणि शैक्षणिक प्रणालींमध्ये मानसिक आरोग्य सहाय्याचा समावेश करणे या प्रमुख उपाययोजनांवर भर दिला.
पत्र सूचना कार्यालय, मुंबईचे संचालक सय्यद राबीहाश्मी यांनी आरोग्यविषयक चुकीच्या माहिती संदर्भातील तथ्य तपासणी सत्राचे आयोजन केले होते, ज्याचा उद्देश बोगस माहिती ओळखणे, अचूक आरोग्य संवादाला प्रोत्साहन देणे तसेच जबाबदार वार्तांकनाला प्रोत्साहन देणे याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा होता.
युनिसेफ महाराष्ट्राचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. मंगेश गढारी यांनी आयोजित केलेल्या एका वेगळ्या सत्रात असंसर्गजन्य आजारांनी (एनसीडी) ग्रस्त मुले आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनी आपल्या आव्हानांचे आणि समाजाकडून असलेल्या अपेक्षांचे वर्णन केले.
समारोप सत्रात एका संवादात्मक गट सरावाचा समावेश होता जिथे माध्यम प्रतिनिधींनी बाल्यावस्थेतील एनसीडींवर आधारित माहिती देण्यात आली. त्यानंतर सहयोगी शिक्षणाला चालना देणारा आणि प्रभावी आरोग्य अहवाल देण्याची क्षमता बळकट करणारा सहकाऱ्यांचा आढावा आणि अभिप्राय यांचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात बाल्यावस्थेतील असंसर्गजन्य आजार (एनसीडी) ही एक छुपी आणीबाणीसदृश स्थिती झाली असून राज्यातील सहा दशलक्षाहून अधिक बालके या आजारांनी प्रभावित झाली आहेत. मधुमेह, दमा, जन्मजात हृदयरोग, सिकल सेल आजार आणि स्थूलता हे एकेकाळी प्रौढांचे समजले जाणारे आजार आता लहान मुलांमध्ये वाढत्या प्रमाणात दिसून येत आहेत. जागतिक पातळीवर विचार करता हे एनसीडी एकूण मृत्यूंपैकी तब्बल 71 टक्के मृत्यूंना कारणीभूत असल्याचे दिसते. भारतात, तीनपैकी दोन मृत्यू अशा प्रकारच्या आजारांनी झालेले दिसतात. महाराष्ट्रात देखील हाच कल दिसून येत असून राज्यात टाईप 1 प्रकारच्या मधुमेहाचे सुमारे 2,000 नवे रुग्ण आणि जन्मजात हृदयरोगाचे 20,000 ते 25,000 नवे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील 3.3 दशलक्ष बालकांना दम्याचा त्रास असून 8.8 दशलक्ष बालकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मानसिक विकार जडलेला आहे. राज्यामध्ये बाल्यावस्थेतील स्थूलतेचे प्रमाण देखील वाढत असून 2.4 दशलक्ष लठ्ठ मुलांसह एकूण सहा दशलक्षांहून अधिक मुलांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे असे दिसते.
