Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी संरक्षण उत्पादन उद्योगासाठी सहाय्यभूत ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीसंदर्भात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा


आंतरराष्ट्रीय संशोधन, तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मितीला प्राधान्य

नागपूर, दि.१३ : संरक्षण उत्पादन क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. त्यासोबतच तीन मध्यवर्ती डिफेन्स कॉरिडॉर तयार होत असल्यामुळे संरक्षण, उत्पादन क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तज्ज्ञ व कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेवून भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठाने भविष्याच्या गरजा ओळखून अभ्यासक्रम तयार करावा,अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.

सेंट्रल हिंदू मिल्ट्री एज्यूकेशन संस्थेतर्फे नागपूर येथे भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटी सुरु होत आहे. संरक्षण विषयक विद्यापीठ कसे असावे तसेच देशाच्या संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी विद्यापीठाची भूमिका यासंदर्भात देशातील नामवंत उद्योजक, संरक्षण उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच भारतीय संरक्षण दलातील अधिकाऱ्यांसोबत एक दिवशीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चा सत्राच्या समारोप प्रसंगी मार्गदर्शन करतांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
 

यावेळी एअरचिफ मार्शल आर.के.एस. भदुरीया,एअरचिफ मार्शल व्ही.आर. चौधरी, मनोज पांडे, एअर मार्शल शिरिष देव, ले. जनरल डॉ. राजेंद्र निंभोरकर, लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कान्हेटकर, प्रा.अनिल सहस्त्रबुद्धे, बाबासाहेब एन. कल्याणी, सत्यनारायण नुवाल, डॉ. जयजित भट्टाचार्य, नितिन गोखले, डॉ. विजय चौथाईवाले, ॲड. सुनिल मनोहर, श्रीहरी देसाई, प्रा. मकरंद कुळकर्णी, महेश दाबक, आशिष कुळकर्णी, नारायण रामास्वामी, संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर, राहुल दिक्षित आदी उपस्थित होते.

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात करताना संरक्षण उत्पादन तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग घेण्यात येत असून विद्यापीठाचा अभ्यासक्रम तसेच नवसंशोधन, तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती संदर्भात विविध सूचना करण्यात आल्या आहेत. भारताच्या संरक्षण, उत्पादन व संशोधन क्षेत्रासाठी विद्यापीठ महत्वाची भूमीका बजावेल,अशी अपेक्षा व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संरक्षण क्षेत्राची गरज लक्षात घेवून विविध अभ्यासक्रमांचा समावेश व्हावा. जागतिकस्तरावर संरक्षण क्षेत्रात नवतंत्रज्ञानाची मागणी वाढत आहे. या क्षेत्रातील उत्पादनाची गुणवत्ता तसेच प्रमाणिकरण यावर विशेष भर देण्याची आवश्यकता आहे. आयआयटी मुंबई प्रमाणेच जागतिक दर्जाचे विद्यापीठ निर्माण व्हावे, ही या संस्थेच्या निर्मितीमागची भूमिका असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

संरक्षण क्षेत्रातील उच्च तंत्रज्ञान असलेली संस्था म्हणून भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीचा विकास करतांना भविष्यात या क्षेत्रातील आव्हानासंदर्भातही येथे नाविन्यपूर्ण संशोधन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण उत्पादन क्षेत्रातील उद्योजकांसाठी हे विद्यापीठ मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संरक्षण क्षेत्रातील उत्पादनांसोबतच निर्यातीला प्रोत्साहन दिल्यामुळे नागपूर येथे संरक्षण उत्पादन उद्योगांची सुरुवात झाली आहे. तसेच नागपूर हे संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित होत असल्यामुळे या विद्यापीठाला विशेष महत्व असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

भोसला डिफेन्स युनिव्हर्सिटीची निर्मिती तसेच भविष्यातील वाटचाल यासंदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण उत्पादन करणाऱ्या विविध संस्थांनी विद्यापीठाच्या माध्यमातून या क्षेत्राला सहाय्यभूत ठरेल असे अभ्यासक्रम असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. विद्यापीठामार्फत पदवी, पदवीका तसेच मास्टर प्रोग्राम तयार करण्यात आले असून यामध्ये संरक्षण उत्पादन व तंत्रज्ञान, लिडरशिप ॲण्ड मॅनेजमेंट इनोव्हेशन ॲण्ड डिझाईन, इंटरनॅशनल रिलेशन ॲण्ड पब्लिक पॉलिशी तसेच नॉन कन्हेन्शल डिफेन्सस्टडी यासारख्या अभ्यासक्रमाचा समावेश असावा, अशी सूचना केली.

भोसला एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी सांगितले की, सुमारे ५२ एकर परिसर डिफेन्स युनिव्हर्सिटीची सुरुवात होत असून यामध्ये संरक्षण, उत्पादन व संशोधन आदी विषयासंदर्भातील अभ्यासक्रमाचा समावेश राहणार आहे. येथे सुसज्ज प्रयोगशाळा व टेस्टिंग फिल्डची व्यवस्था राहणार असून देशातील एक अग्रगण्य विद्यापीठ म्हणून विकसित करण्याचा मानस आहे.

प्रारंभी ॲड. अविनाश भिडे यांनी स्वागत केले तसेच विद्यापीठाच्या निर्मिती व भूमिकेसंदर्भात एअर मार्शल एस.बी. देव यांनी माहिती दिली. आभार उपाध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, सदस्य दिलीप चव्हाण, रतन पटेल, सचिव राहुल दिक्षित, कोषाध्यक्ष संजय जोशी, कर्नल अमरेंद्र हरदास, सारंग लखानी, हेमंत देशपांडे, मानशी गर्ग आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |