डोंबिवली : नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर कल्याण ग्रामीणमधील कामगारांसाठी ऐतिहासिक दिवस ठरला. कल्याण ग्रामीणमधील २७ गावांतील ४९९ कर्मचाऱ्यांना अखेर नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सफाई कामगारांना पालिकेत कायमस्वरूपी कामावर घेण्याच्या विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अथक प्रयात्नाने हा प्रश्न मार्गी लागला. कामगार वर्ग आणि त्यांच्या परिवाराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेव खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत झालेल्या या कार्यक्रमात आयुक्त अभिनव गोयल साहेब, उपायुक्त हर्षल गायकवाड आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघांचे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते कामगारांना नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले, यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील , उपतालुकाप्रमुख गजानन पाटील, माजी नगरसेवक विष्णूशेठ गायकवाड, महेश गायकवाड़, गुलाब वझे, दत्ता वझे, जलिंदर पाटील, मोरेश्वर भोईर आदी उपस्थित होते.
नवरात्रीच्या मंगल प्रसंगी झालेल्या या नियुक्तीपत्र वितरणामुळे कामगार व त्यांच्या परिवारात आनंदाचे, समाधानाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
