केडीएमसी क्षेत्रात ११ हजार ५८९ गणेश मूर्तींचे विसर्जन
कल्याण ( शंकर जाधव ) : अनंत चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत भक्तीमय वातावरणात कल्याण डोंबिवली परिसरातील ११ हजार ५८९ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन सामाजिक, सेवाभावी संस्था यांच्या मदतीने तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहकार्याने संपन्न झाले. कल्याण डोंबिवली महापालिका परिक्षेत्रात भाद्रपद महिन्यातील श्री गणेश मूर्तींचे विसर्जन विविध विसर्जन स्थळावर करण्यात आले.
यामध्ये विसर्जन पीओपीच्या८३४० श्री गणेश मूर्तींचे आणि शाडू मातीच्या ३२४९ अशा एकूण ११५८९ श्री गणेश मूर्तींचे विसर्जन आज सकाळपर्यंत करण्यात आले.
विसर्जन करते वेळी श्री गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशानुसार सर्व विसर्जन स्थळांवर अधिकारी वर्गाची नेमणूक करण्यात आली होती. महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड व इतर अधिकाऱ्यांसमवेत कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाट या प्रमुख विसर्जन स्थळी रात्रीचे वेळी स्वतः उपस्थित राहून विसर्जन व्यवस्थेची पाहणी केली.
श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेने वैद्यकीय पथक,फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, निर्माल्य संकलनासाठी निर्माल्य कलश इ. सुविधा सज्ज ठेवल्या होत्या, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली, महापालिकेने वेळोवेळी केलेल्या आवाहनानुसार बहुसंख्य नागरिकांनी यावर्षीच्या गणेशोत्सवात आपल्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला प्राधान्य दिलेआणि हा गणेशोत्सव शांततामय मार्गाने पार पडण्यास सहकार्य केले त्याबद्दल आयुक्तांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.
विसर्जन स्थळी जमा झालेले सुमारे ६६ टन निर्माल्य , खत प्रकल्प गणेश मंदिर डोंबिवली एमआयडीसी व मा.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांचा खत प्रकल्प तसेच क.डो. म.पा.बायोगॅस प्रकल्प व खत प्रकल्प येथे पाठविण्यात आले.अशाप्रकारे निर्माल्य खाडी नदी यामध्ये न टाकल्यामुळे जलस्त्रोतातील प्रदूषणात घट होण्यास मदत झाली आहे.डोंबिवली पूर्वेकडील माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशभक्तांकरता अल्पोहार ठेवण्यात आला होता. सहकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाच्या मूर्तिचे विसर्जन करताना महेश पाटील, माजी नगरसेविका सायली विचारे, समाजसेवक संजय विचारे, शिवसेना पदाधिकारी अमोल पाटील यांनी पुष्पवृष्टी करून श्री गणेशाला नमन केले.
