Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा – सीजीएसटीचे प्रधान मुख्य आयुक्त के. आर. उदय भास्कर

जीएसटी २.० : विकसित भारतासाठी नवी दिशा चर्चासत्र


मुंबई : देशातील जीएसटी संकलनात वाढ होत आहे. महाराष्ट्राचा वाटा यामध्ये २१ टक्के असल्याचे सीजीएसटीचे प्रधान मुख्य आयुक्त के. आर. उदय भास्कर यांनी येथे सांगितले.

वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज (AIAI) यांच्या संयुक्त विद्यमाने “जीएसटी २.० : विकसित भारताचा मार्ग” या विषयावर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी श्री. के. आर. उदय भास्कर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर, राज्यकर विभाग आयुक्त आशीष शर्मा, डब्ल्यूटीसी (WTC) व एआयएआयचे (AIAI) अध्यक्ष विजय कलंत्री व यांच्या सह संबंधित उपस्थित होते.


के. आर. उदय भास्कर म्हणाले की, करदात्यांचे प्रमाण २०१७ मधील ६६.५ लाखांवरून २०२५ मध्ये १.५३ कोटींवर पोहोचले असून महसूल संकलन ₹२२.०८ लाख कोटींच्या उच्चांकावर गेले आहे. महाराष्ट्राचा वाटा यामध्ये २१ टक्के (₹७.५ लाख कोटी) आहे. सुधारणा संरचनात्मक, दरांचे तर्कसंगतीकरण आणि जीवनमान सुलभता या तीन स्तंभांवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले.


आयुक्त आशीष शर्मा म्हणाले, दर तर्कसंगतीकरणामुळे शुल्क रचना दुरुस्त होऊन ‘एमएसएमई’ क्षेत्राला मोठा लाभ होईल.

टीसीएन ग्लोबलच्या (TCN Global) अनिंदिता चॅटर्जी यांनी नफा-नियंत्रण यंत्रणा (Anti-Profiteering) तातडीने लागू करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. करतज्ज्ञ रागिनी तुलसियन यांनी उद्योगांना करसमाविष्ट करार व लेखापुस्तकांचे पुनर्संतुलन याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला.

डब्ल्यूटीसी मुंबई व एआयएआयचे अध्यक्ष विजय कलंत्री, यांनी एमएसएमई क्षेत्राचे ३० टक्के जीडीपीतील योगदान आणि ६० टक्के रोजगारातील भूमिका अधोरेखित केली. कर दर कपातीमुळे मागणीत वाढ होऊन उद्योगक्षेत्र स्पर्धात्मक होईल असे त्यांनी सांगितले.

या सत्रात केंद्र व राज्यातील वरिष्ठ कर अधिकारी, करतज्ज्ञ, व्यावसायिक समुदायाचे सदस्य व मान्यवर सहभागी झाले. संगीता जैन, वरिष्ठ संचालक, AIAI, यांनी मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |