उरण दि ८ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण मध्ये अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या कार्यरत असून कंपनी मध्ये वारंवार आग लागणे, स्फोट होणे यामुळे उरण मधील विविध राष्ट्रीय प्रकल्प, राष्ट्रीय कंपनी यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे शिवाय नागरिकांचीही सुरक्षितता धोक्यात आली आहे. सोमवारी असाच प्रकार उरण मध्ये घडला आहे.उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील अशा ओनजीसी प्रकल्पाला भीषण आग लागली आहे. सोमवार दिनांक ८ /९/२०२५ रोजी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही आग लागली आहे.या दुर्घटनेचे काही व्हिडीओ समोर आले असून सगळीकडे धुराचे आणि आगीचे लोट दिसत आहेत. ही आग विझविण्यासाठी सीआयएसएफ आमि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागलेली आग पाहून लोकांमध्ये घबराट पसरलेली असून ही आग आणखी रौद्ररूप धारण करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
उरणधील पिरवाड समुद्र किनारी असलेल्या ओनजीसी प्रकल्पात मोठी आग लागली आहे. ही आग लागल्याचे समजताच प्रकल्पाच्या प्रशासनाने अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलानेही कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. सध्या ही आग विझविण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अग्निशमन दलाची पूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. ही आग लागल्यामुळे संपूर्ण उरण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र आहे. याच प्रकल्पात नैसर्गिक वायू आणि तेलाचे वितरणही केले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात विलंब लागला तर ही आग आणखी रौद्ररुप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.मात्र अशा घटना ओएनजीसी घटनेत वारंवार घडत असून अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
