कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार मतदार नावे आढळून येत असल्याच्या तक्रारी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या.
या संदर्भात जिल्हा संघटक तात्या माने यांच्या नेतृत्वाखाली, कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख अॅड. रोहिदास मुंडे, दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व उपशहर प्रमुख मारुती पडलकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, दिवा शहरासह संपूर्ण कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मतदार याद्यांमध्ये असंख्य मतदारांची नावे दोनवेळा किंवा त्याहून अधिक वेळा समाविष्ट झाली आहेत. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होतो असून, निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात येत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्पष्ट मागणी केली की, सर्व दुबार नावे तात्काळ वगळून मतदार यादी शुद्ध करण्यात यावी, जेणेकरून लोकशाही प्रक्रियेत जनतेचा विश्वास कायम राहील.
पक्षाने निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले की, या प्रकरणी तातडीने कार्यवाही झाली नाही तर मतदारांचा विश्वास कमी होईल आणि लोकशाही धोक्यात येईल.