ठाणे – “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, बदलापूर येथे विशेष तज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत आरोग्य सेवा उपक्रमाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगरसेवक अनिलजी भगत यांनी भूषविले, तर प्रमुख पाहुण्या म्हणून नीता खोतरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी उपस्थित होत्या. प्राथमिक आरोग्य केंद्र बदलापूर वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत कनोजा व डॉ अश्विनी वाणे, औषध निर्माण अधिकारी आर वाय पाटील , आरोग्य सहायक बोरकर, शिबिरासाठी विविध तज्ञ डॉक्टर आणि संस्थांनी मोलाची सेवा बजावली. यात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुणा बेल्लुरे, बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत काटकर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रविंद्र चव्हाण, शमन कॅन्सर टीममधील डॉ. शीतल व सहकारी, एम.एम. युनिट आणि मॅमोग्राफी युनिटच्या डॉ. सदावर्ते व सहकारी, वत्सल्य आयसीएमआर मुंबईच्या डॉ. प्रेरना पाटील व सहकारी तसेच ईशा नेत्रालय व टीम यांचा समावेश होता.
या शिबिरामध्ये एकूण १६८ रुग्णांनी (१३४ महिला व ३४ पुरुष) सहभाग घेतला. विविध तपासण्या करण्यात आल्या ज्यामध्ये स्त्रीरोग तपासणी ४५ महिला, नेत्र तपासणी २१ रुग्ण, दंत तपासणी २६ रुग्ण, बालरोग तपासणी २१ बालरुग्ण, मानसोपचार तपासणी १२ रुग्ण, पॅप स्मीअर तपासणी १३ महिला व साय-टीबी तपासणी १६ रुग्णांचा समावेश होता. महिलांच्या आरोग्य तपासण्या, कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी व बालरोग तपासणीमुळे स्थानिक नागरिकांना महत्त्वपूर्ण सुविधा मिळाली.
या कार्यक्रमावेळी आशा स्वयंसेविका संजीवनी पाटील यांनी काढलेली सुंदर रांगोळी आकर्षणाचे केंद्र ठरली. शिबिराबाबत लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त करत “स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान” या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.