उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात सेवा पंधरवडा व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ संपन्न
ठाणे,दि.17:- ग्रामीण विकास व पंचायत राज प्रणालीला बळकटी देणे, नागरिकांना शासनाच्या सेवा थेट उपलब्ध करून देणे, आरोग्य व पोषण जनजागृती वाढविणे तसेच स्वच्छता, लोकसहभाग यावर आधारित विविध राज्य व केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अभियानांची ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावरील अभियान शुभारंभ ग्रामपंचायत खोणी- वडवली बू, पंचायत समिती कल्याण येथे आज करण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच याप्रसंगी “सेवा पंधरवडा” उपक्रमाचेही उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले व लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशात विविध अभियानांचे शुभारंभ करण्यात आले आहेत. महिलांसाठी सशक्त नारी-सशक्त परिवार अभियान सुरू केले आहे. आपला देश विकासाच्या वाटेवर असून देशाचे नावलौकिक करण्यासाठी कामकाज सुरू आहे. याचाच भाग म्हणून 431 ग्रामपंचायतींमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भाग सक्षम असेल तर जिल्हा सक्षम होईल म्हणून अभियानाच्या माध्यमातून आज अभिमानाची सुरुवात करण्यात आली आहे. लोकाभिमुख, कल्याणकारी अभियान पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आले असून रस्ते, दिवे, पाणी, शाळा असून समृध्द गाव करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. खोणी हे गाव समृध्द गाव होण्याच्या मार्गावर आहे.
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू राहील आणि महिलांना सक्षम करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. महिलांचे आरोग्य तपासणी या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. कॅन्सरग्रस्त महिलांच्या तपासणी करून लवकरात लवकर उपचार करण्यासाठी आज अभियान सुरू केले आहे.
या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनांचे लाभ घेऊन आणि अभियान राबवून समृद्ध गाव करण्यासाठी पुढाकार घ्या. ग्रामस्थांना रोजगार गावात उपलब्ध करून देण्यासाठी या अभियानांतर्गत विविध शासकीय योजनाचा व सेवेचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच 100 दिवस कृती कार्यक्रम स्पर्धेत जिल्हा परिषद, ठाणे राज्यात पहिला क्रमांक मिळाला याबद्दल अभिमान वाटतो. यापुढे देखील शेतकऱ्यांना, ग्रामस्थांना तसेच महिलांना सोबत घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान उत्तम प्रकारे राबवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ठाणे जिल्हा महाराष्ट्रात प्रगत जिल्हा झाला पाहिजे, यासाठी सर्वांना सदिच्छा देऊन देश आत्मनिर्भर करण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यासाठी प्रथम गावाला समृद्ध करून 2047 सालाचे स्वप्न विकसित भारत करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, जिल्ह्यात “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत पाणंद रस्ते, रेती, घरकुल, सनद वाटप, सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र यासारखे लोकाभिमुख उपक्रम राबवून विविध सेवा नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी “सेवा पंधरवडा” अभियान यशस्वीपणे राबविण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानासोबतच सशक्त नारी- सक्षम परिवार अभियान राबवून वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 1 लाख 54 हजार 300 वृक्षारोपण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या निमित्ताने सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान जिल्हास्तरीय ऑनलाईन शुभारंभ व माहिती पुस्तिका अनावरण, 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' अभियान जिल्हास्तरीय ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत खोणी दिव्यांग निधी वाटप, स्वस्थ नारी-सशक्त परिवार, आयुष्यमान कार्ड वाटप, पोषण महा अभिमान अंतर्गत गरोदर मातांना बेबी केअर किट वाटप, स्वच्छता ही सेवा योजना स्वच्छता किट वाटप (स्वच्छता कर्मचारी), सेवा पंधरवडा, सर्वांसाठी घरे-रहिवास अतिक्रमण नियमानुकूल केलेल्या प्रातिनिधीक स्वरुपात सनद वाटप, पाणंद रस्ता अतिक्रमण मुक्त केल्याचे प्रमाणपत्र, संजय गांधी/श्रावण बाळ योजनेच्या लाभाचे वाटप, शिधापत्रिका व विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
खोणी गावात ग्रामस्थांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपणामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. विस्तार अधिकारी पंचायत समिती कल्याण पराग भोसले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धेसाठी करावयाच्या तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार बालाजी किणीकर, आमदार सुलभा गणपत गायकवाड, राजेश मोरे, विभागीय आयुक्त कोकण विभाग डॉ.विजय सूर्यवंशी, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, अमित सानप, ज्योती कांबळे-पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरुडकर, महिला व बालविकास विभाग प्रमुख संजय बागुल, गटविकास अधिकारी पंचायत समिती कल्याण संजय भोये, तहसिलदार सचिन शेजाळ, अभिजित देशमुख, अभिजित खोले, परमेश्वर कासुळे, माजी नगरसेवक महेश पाटील, खोणी गावातील सरपंच हनुमंत ठोंबरे, ग्रामविकास अधिकारी दिलीप जागरे तसेच मोठ्या संख्येने उपस्थित बचतगटातील महिला, ग्रामस्थ तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे यांनी आभार व्यक्त केले. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात खासदार व आमदार, महसूल व जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत सेवा पंधरवडा आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ उत्साहात संपन्न झाला.