दिवा : दिवा परिसरातील प्रभाग रचना सुधारण्याची मागणी सेव्ह दिवा फाउंडेशनने ठामपणे केली आहे. या मागणीला कोणताही राजकीय हेतू नसून दिवा परिसरातील नागरिकांना न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे हा मुख्य उद्देश असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. रोहिदास बामा मुंडे यांनी सांगितले.
2017 च्या रचनेप्रमाणे प्रभाग क्रमांक 27 व 28 सलग होते; मात्र नव्या रचनेत प्रभाग 29 मध्ये चुकीच्या पद्धतीने काही भाग टाकल्याने मोठा असंतोल निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रभाग 29 ची लोकसंख्या 38,172 इतकी कमी असून सरासरीपेक्षा जवळपास 4,000 मतदार कमी आहेत. तर प्रभाग 30 मध्ये 60,105 इतकी लोकसंख्या असल्याने 21,933 मतदारांचा जास्तीचा भार आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक प्रभागातील लोकसंख्या सरासरीपेक्षा ±10 टक्क्यांच्या मर्यादेत असणे बंधनकारक आहे. मात्र दिव्यातील सध्याची रचना या नियमाचे उल्लंघन करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
“लोकसंख्येतील समतोल बिघडल्याने नागरिकांना मूलभूत सेवा व प्रतिनिधीत्वात अन्याय होत आहे. एक मत – एक मूल्य हे लोकशाहीचे तत्त्व पाळलेच पाहिजे,” असे मुंडे यांनी स्पष्ट केले.
फाउंडेशनने प्रशासनाला मागणी केली आहे की, प्रभाग 27 व 28 हे 2017 प्रमाणे ठेवावेत, तसेच प्रभाग 29 मध्ये सुमारे 7,000 नागरिकांचा समावेश करून तो कायदेशीर मर्यादेत आणावा.
