उरण दि ८ ( विठ्ठल ममताबादे ) : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून सुधीर घरत सामाजिक संस्था, नवघर- उरण यांच्या विद्यमाने वीर वाजेकर महाविद्यालयातील शिक्षकांचा गुणगौरव समारंभ दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता.महाभारतातील युद्धाचा संदर्भ देत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा महाविद्यालय विकास समिती सदस्य सुधीर घरत म्हणाले की, कौरव हे पांडवांपेक्षा सैन्य संख्या, सेनानी आणि विविध दले तसेच पराक्रमी योद्धे या सर्वच बाबतीत वरचढ होते ,परंतु कौरवांकडे कृष्णासारखा मार्गदर्शक नव्हता म्हणूनच पांडव युद्ध जिंकू शकले. जीवनात मार्गदर्शक हा नेहमी दीपस्तंभासारखे कार्य करतो. तो आपल्याला योग्य वाटेवर मार्गक्रमण करण्यासाठी प्रकाश दाखवत असतो. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सध्याचा काळ आव्हानात्मक असला तरी समाजातील भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षक त्यांच्या परीने चांगले प्रयत्न करीत आहेत. याच चांगल्या प्रयत्नांना दाद म्हणून आमच्या संस्थेने वीर वाजेकर महाविद्यालयातील शिक्षकांचा गौरव केला आहे.असे मनोगत सुधीर घरत यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर सर यांनी देखील याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केले.
शिक्षक हा समाजाचा मार्गदर्शक असून त्याच्या कृतिशील व गतिशील विद्यार्थांना प्रेरित करून सदृढ समाज परिवर्तनाचे कार्य करू शकतो. या गौरवामुळे प्रेरित होऊन आणखी चांगल्या प्रकारे काम करण्याची ऊर्जा मिळाली अशा भावना डॉ आमोद ठक्कर यांनी व्यक्त केल्या.या शिक्षक दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी हर्षदा महाकाळ आणि प्रणाली सपकाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिक्षक गुणगौरव समारंभ प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय सेवक व शिक्षकेतर कर्मचारी यांना पेन, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमात महाविद्यालयातील नॅशनल कॅडेट कोर मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना देखील सी सर्टिफिकेट तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याशिवाय महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थी सुधीर घरत पुरस्कृत आयोजित राष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचे निकाल देखील जाहीर करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. गजानन चव्हाण यांनी तर कार्यक्रमाचे आभार स्टाफ वेल्फेअर कमिटीच्या चेअरमन सुप्रिया नवले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात डॉ. सुजाता पाटील व डॉ. श्रेया पाटील यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमास शोभा आली. महाविद्यालयातील स्टाफ वेल्फेअर कमिटीने या कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, प्रशासकीय सेवक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
