ठाणे दि. ०३ – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी जिल्हा स्तरावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. ३ सप्टेंबर, २०२५ रोजी ठाणे येथील बी. जे. हायस्कूल सभागृह, टेंभी नाका येथे "मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान" या शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्हास्तर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा परिषदेबरोबरच जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित राहून अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जबाबदाऱ्या यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यशाळेच्या माध्यमातून ग्रामविकासाला गती देऊन प्रत्येक गावात शाश्वत विकास साधण्यावर भर देण्यात आला.
ग्रामपंचायतींनी पीएम आवास, जलसंधारण व महसुलाशी संबंधित काम वेळेत करावे. समन्वय ठेवावा तसेच ग्रामपंचायतीना अभियानात पात्र होण्यासाठी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना योजनांची अचूक माहिती द्यावी. या कार्यशाळेत मनरेगा अंतर्गत घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने व सार्वजनिक मत्ता यांचे नोंदी व सुस्थितीत असल्याची दक्षता घेण्याबाबत सुचना दिल्या. महिला बचतगट, बांबू लागवड उपक्रम तसेच त्यासाठी बाजारपेठ उभारणी, आरोग्य व पायाभूत सुविधांसाठी मिशन कायाकल्पांतर्गत योजना प्रभावीपणे राबवावे. सौरदिवे, ई-लायब्ररी सारखे जिल्ह्यात नाविन्यपुर्ण उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. तसेच सर्व गांमपंचायतींना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांत सहभागी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामविकासाची खरी ताकद लोकसहभागात असल्याचे सांगून प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वनिधी, जलसमृद्धी, घरकुल, पशुवैद्यकीय दवाखाने, सार्वजनिक मत्ता व उपजीविका योजनेसारख्या उपक्रमांवर ठोस कामकाज करावे, असे आवाहन केले. त्यांनी स्वामित्व योजना, मिशन कायाकल्प, आरोग्य सुधारणा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करून ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जल्लोषाने सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यशाळेत सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांशी अभिसरण, संस्था सक्षमीकरण, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोकसहभागातून लोकचळवळ, नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्वनिधी निर्मिती व लोकवर्गणीद्वारे ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, पाणीपुरवठा, जलसंधारण व पर्यावरण संवर्धन, शेततळे व घरकुल बांधकाम योजनेशी अभिसरण, ग्रामपातळीवरील संस्थांचे सक्षमीकरण आणि महिला बचतगट, शेतकरी व दुर्बल घटकांसाठी ठोस उपाययोजना यावर विशेष भर देण्यात आला.
सरपंच (काल्हेर) आश्लेषा पंकज तरे यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत अधिकाधिक ग्रामपंचायती पात्र व्हाव्यात आणि स्पर्धेत जिंकावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.
कार्यशाळेला प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र.) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, कार्यकारी अभियंता (बांधकाम) पद्माकर लहाने, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्वला सपकाळे, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर तसेच मोठ्या संख्येने ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यशाळेत विस्तार अधिकारी (सेवानिवृत्त) विक्रम चव्हाण व विस्तार अधिकारी (पंचायत समिती, भिवंडी) इंद्रजीत काळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक गट विकास अधिकारी पंडित राठोड यांनी केले.
