कल्याण : " विपश्यना साधना आणि साहित्य साधना या दोन किनाऱ्यांनी डी.एल. कांबळे यांची जीवन सरीता प्रवाहित झाली आहे. अठरा शिबीरातून कांबळे यांनी तीनशे छत्तीस दिवस विपश्यना केली आहे. धम्मपद गाथा आणि कथा यांचा सात खंडात तर बोधिसत्वाच्या जातक अट्टकथांचा अकरा खंडात मूळ पाली भाषेतून त्यांनी मराठीत केलेला अनुवाद हे कांबळे यांचे मौलिक असे ऐतिहासिक कार्य आहे. एकूण पंचवीस पुस्तके लिहिणारे कांबळे यांचे धम्मकार्यातील योगदान अभिनंदनीय आहे." असे प्रतिपादन हिंदी , मराठी साहित्यिक प्रा. दामोदर मोरे यांनी केले. ते कल्याण येथील बुद्धभूमी फाऊंडेशन येथे लेखक डी. एल. कांबळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात प्रमूख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम प्रज्ञाबोधी संस्थेने आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी साहित्यिक निरंजन पाटील हे होते. कांबळे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकतांना प्रा. मोरे म्हणाले की, "औरंगाबादच्या नागसेन वनात कांबळे यांच्या मनोभूमीत आंबेडकरी विचारांचे बीज पेरले गेले त्याचाच आज दरवळणारा डौलदार वृक्ष झाला आहे."
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. डी. एल. कांबळे यांच्या निदान कथा खंड अकराव्याचे आणि सुनिल सोनवणे संपादित डी. एल.कांबळे अमृत महोत्सवी गौरव ग्रंथ "धम्म सारथी" चे प्रकाशन प्रा. दामोदर मोरे आणि राजाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. मोरे यांनी " दामोदर मोरे की कविता में आंबेडकरवादी दृष्टि" हा कालीचरण स्नेही संपादित ग्रंथ कांबळे यांना वाढदिवसानिमित्त भेट दिला. यावेळी प्रज्ञाबोधी संस्थेच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ आणि मानपत्र देऊन डी. एल.कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी आगरी सेनेचे नेते राजाराम पाटील म्हणाले कि, " बौद्ध आणि ओबीसी समाजाचे मूळ भारतीय बौद्ध संस्कृतीशी दृढ नातं आहे. ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन हे नाते जपले पाहिजे. कांबळे यांचे सर्व ग्रंथ मी वाचले आहेत. बौद्ध बांधवांनी कांबळे यांचे दोन ग्रंथ विकत घेऊन त्यापैकी एक आपल्या भागात राहणाऱ्या कोळी,भंडारी, ओबीसी बांधवांना भेट द्यावा व त्यांचे प्रबोधन करावे. सत्काराला उत्तर देताना डी.एल. कांबळे यांनी सत्कारा विषयी कृतज्ञता व्यक्त केली. " तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून मला गहिवरून आले आहे" असे ते म्हणाले. प्रारंभी प्रज्ञाबोधीचे सुनील सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. तर प्रा. युवराज मेश्राम यांनी आभार मानले. खच्चून भरलेल्या या कार्यक्रमास भिक्खू संघ, साहित्यिक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, शिवा इंगोले, चंद्रशेखर भारती , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,भीमराव रायभोळे, , दिपश्री बलखंडे, प्रताप पातोडे , राजेंद्र बनसोडे, मच्छिंद्र कांबळे, वैभव काळखैर, प्रज्ञा बोधीचे ॲड. शंकर रामटेके, शाम भालेराव, नारायण सोनकांबळे, एन. एस. भालेराव, डॉ. सुषमा बसवंत , उमेश गोटे , चंद्रकांत सोनवणे, यशवंत बैसाणे आणि सर्व सन्माननीय सभासद तसेच महिला वर्ग मोठ्या संखेने उपस्थित होता. डी. एल. कांबळे यांनी उपस्थितांना भोजन दिले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
