कल्याण : प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली तर कामात चांगले परिवर्तन होणे शक्य आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी काल आचार्य प्र. के. अत्रे रंग मंदिरात आयोजिलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात केले.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांच्या "दोन राजांची गोष्ट" या संकल्पनेतून महापालिकेच्या वर्धापन दिन सोहळ्यात साकारलेल्या भव्य दिव्य अश्या कार्यक्रमात बोलतांना आयुक्तांनी प्रतिपादन केले. वर्धापन दिना निमित्त सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यां शुभेच्छा देत हा दिवस स्वत:साठी आत्मचिंतन करण्याचा दिवस आहे. प्रशासनात प्रत्येकाचे कार्य महत्वाच आहे ही जाणीव ठेवून काम कराव. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सर्जनशील पैलुला वाव देण्यासाठी आपण या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आपण नागरिकांना चांगली पारदर्शक आणि गतिमान सेवा दिली तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली किर्ती पोहचेल यासाठी आपण पूर्ण कार्यक्षमतेने काम करावे असे ते पुढे म्हणाले.
आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी Stress Management चे आणि Art Of Living चे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.महापालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांचे लेखन, मार्गदर्शन आणि नेपथ्याखाली* आयोजिलेल्या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना व देशभक्तीपर गीताने करून या कार्यक्रमात प्रथमच नृत्य,नाट्याद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी केलेले प्रबोधनात्मक कार्य, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा यांचे अत्यंत प्रभावी सादरीकरण करणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गास उपस्थित श्रोतृ वर्गाने टाळ्यांच्या प्रचंड गजरात प्रतिसाद दिला. तदनंतर महाराष्ट्राच्या गौरवशाली प्ररंपरेतील माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, राणी दुर्गावती, संत तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, गागा भट्ट, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, बिरसा मुंडा, सुभाषचंद्र बोस, सावित्रिबाई फुले, ताराराणी, कॅप्टन लक्ष्मी स्वामिनाथन यांच्या भूमिका महापालिकेच्या अधिकारी कर्मचारी वर्गाने, भूमिकेत जीव ओतून साकारल्या इतकेच नव्हे तर महापालिकेचे वाहन चालक प्रकाश वाघ यांनी वटवलेली कडक लक्ष्मी, वन्स मोअरची दाद घेवून गेली. अखेरीस स्वत: मुख्य लेखा परिक्षक सुरेश बनसोडे यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या नयनरम्य डोळ्याचे पारणे फिटविणारा भव्य दिव्य अलौकिक अशा शिवराज्याभिषेक सोहळ्याने या कार्यक्रमाचा कळस चढविला.
. महेश देशपांडे यांचे अत्यंत कौशल्यपूर्ण निवेदन आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक माणिक शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेवर मोहर उमटविली.
या कार्यक्रमात महापालिकेने सप्टेंबर 2025 मध्ये आयोजिलेल्या पर्यावरण पूरक श्री गणेश दर्शन स्पर्धतील विजेत्यांना रोख रक्कम व स्मृती चिन्ह देवून गौरविण्यात आले त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात उंच शिखरावरून सुमारे 8000 फूट उंचावरून पॅराग्लायडिंग करत महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या महापालिका कर्मचारी अक्षय गायकवाड यास देखील आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास महापालिकेचे सर्व उपायुक्त इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रिडा व सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी केले.
