ठाणे - मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यामध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये घरकुलांना उद्दिष्टाप्रमाणे मंजुरी देणे, मंजुर घरकुलांना कामाचे टप्पयानुसार हप्ता वितरीत करणे, वाळू / रेती पासचे वितरण तसेच सर्व घरकुले भौतिकदृष्टया पूर्ण करणे व टप्पा 2 मधील मंजूर घरकुलांना प्रधानमंत्री सुर्यघर योजना लाभाची अंमलबजावणी हे उपक्रम समाविष्ट आहेत.
त्याअनुषंगाने जिल्हयातील केंद्रपुरस्कृत व राज्यपुरस्कृत योजनेंतर्गत मुरबाड तालुक्यातील पाटगाव, शिरगाव शहापूर तालुक्यातील खातीवली, बोरशेती, खर्डी व भिवंडी तालुक्यातील काटई, कांबे, पारिवली येथील मंजूर ग्रामीण घरकुलांच्या कामांची दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी पाहणी केली. ग्रामीण गृहनिर्मांण, महाराष्ट्र राज्य संचालक डॉ.राजाराम दिघे, अपर आयुक्त (विकास), कोकण विभाग माणिक दिवे यांचे समवेत प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, तसेच उपसंचालक डॉ. सचिन पानझडे व राजलक्ष्मी येरपुडे यांनी ठाणे जिल्हयातील शहापूर, मुरबाड व भिवंडी तालुक्यातील घरकुलांचे कामांची पहाणी केली तसेच पहाणी दौरा दरम्यान लाभार्थ्यांशी संवाद साधून मनरेगाच्या कामाबाबतही लाभार्थ्यांशी चर्चा केली.
या पहाणी दौऱ्यानंतर शहापूर पंचायत समितीमध्ये सर्व गट विकास अधिकारी, सहा.गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), सहा.कार्यक्रम अधिकारी, मनरेगा, सहा.लेखा अधिकारी, डाटा ऑपरेटर घरकुल/नरेगा व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांचा मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण संबंधीत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्या-1 व टप्पा-2 आणि राज्य पुरस्कृत योजनेतील अपूर्ण घरकुले अभियान कालावधीत पूर्ण करणे. सर्व मंजूर घरकुल लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत लाभ देणे. तसेच प्रधानमंत्री सुर्यघर योजना / अन्य योजनेतून टप्पा 2 मधील मंजूर सर्व घरकुलांना सौर ऊर्जा प्रकल्प बसवणे, तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे याविषयांचा आढावा घेण्यात आला व कामे जलदगतीने पूर्ण करणेसाठी मार्गदर्शन डॉ.राजाराम दिघे, संचालक, ग्रामीण गृहनिर्मांण, महाराष्ट्र राज्य व श्री.माणिक दिवे, अपर आयुक्त, कोकण विभाग यांनी केले.
या अभियान कालावधीत उपक्रम पूर्ण करणेचे निर्देश जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना दिले.
