Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

सोनारी येथे ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन उत्साहात साजरा

उरण ३० ( विठ्ठल ममताबादे ) : जेष्ठ नागरिकांचे समस्या सोडविण्यासाठी सोनारी गावात स्थापन झालेल्या जेष्ठ नागरिक संघ तर्फे आजपर्यंत अनेक विविध उपक्रम कार्यक्रम राबविण्यात आले. जेष्ठ नागरिकांचे अनेक समस्या सोडविण्यात आल्याने सदर संस्थेचे नाव सर्वांनाच सुपरिचित झाले आहे.

उरण तालुक्यातील सोनारी येथे मंगळवार दि. २८. १०. २०२५ रोजी ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वर्धापन दिनाचा केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे वादळवारा दैनिकाचे संस्थापक संपादक दा. चां. कडू (गुरुजी) उपस्थित होते. त्यांच्यासोबत रायगड भूषण प्रा. एल. बी. पाटील, उरण तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, करळ गावचे डॉ. अविनाश तांडेल, न्हावा - शेवा पोलिस स्टेशन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक सुर्वे यांचे प्रतिनिधी पीएसआय शांताराम लेंढे, सुजाता दिनेश कडू, ग्रा.पं. सदस्या व सोनारी गावचे अध्यक्ष अजय म्हात्रे इत्यादी उपस्थित होते.

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त दा. चां. कडू(गुरुजी) यांनी ज्येष्ठांकडे असलेला अनुभवाचा खजिना व त्यांनी केलेला जीवन संघर्ष यावर उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर प्रा. एल. बी. पाटील सरांनी 'ज्येष्ठांचा समाजातील असणारा मान तरुणांनी राखला पाहिजे' यावर भाष्य केले तसेच ज्येष्ठांच्या जीवनावर एक सुरेख आगरी भाषेत कविता म्हटली तर रमाकांत म्हात्रे यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांची स्तुती केली.

 इतर पाहुण्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन ज्येष्ठांना मार्गदर्शन केले.तत्पूर्वी ज्येष्ठ सदस्य अशोक शंकर कडू यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संघटना काढून आज आपण नववा वर्धापन दिन साजरा करतो आहे. संघटना इथपर्यंत टिकवण्याचे व चालवण्याचे काम ज्यांनी केले ते संस्थापक दिनेश कडू खरंच कौस्तुकास पात्र आहेत. त्याच सोबत संघटनेसाठी काम करणाऱ्या इतर सदस्यांचा सुद्धा त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आभार व्यक्त केले.

या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष रोहिदास. मो. पाटील, खजिनदार सुभाष.बा. कडू, सेक्रेटरी एन. आर. कडू, सदस्य प्रभाकर काळा कडू, के. के. कडू, केशव तांडेल, केशव. आ. कडू, रामकृष्ण तांडेल, हरिश्चंद्र लक्ष्मण कडू, भरत रसाळ, हरी सोमा तांडेल, प्रभाकर गो. तांडेल इत्यादींसह गावातील अनेक जेष्ठ नागरिक उपस्थित होते.पाहुण्यांच्या हस्ते दोन भेटवस्तू व दिवाळी मिठाई उपस्थितांना देण्यात आली.त्याचबरोबर कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष नारायण कडू यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संस्थापक दिनेश कडू यांनी केले तर पाहुण्यांचे आभार मानण्याचे काम सदस्य के. के. कडू यांनी केले.जेष्ठ नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या या संस्थेचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून ग्रामस्थांनी, नागरिकांनी, विविध सामाजिक संस्थांनी या संस्थेला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |