कोकण : दरवर्षी १५ ऑक्टोबरला जागतिक पांढरी काठी दिन हा अपंग लोकांसाठी सुलभता आणि समावेशनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अंधांसाठीच्या आचार नियमांबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी साजरा केला जातो. आज कोकण संस्थेच्या वतीने दृष्टिहीन लोकांसाठी पांढरी काठी देऊन स्वातंत्र्य आणि गतिशीलता देण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा या हेतूने ६० दृष्टिहीन व्यक्तींना आज पांढरी काठी भेट म्हणून देण्यात आली. अंध व्यक्तीना मुक्तपणे फिरण्यास आणि दैनंदिन कामे पूर्ण करण्यास या काठीने मदत व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबत असल्याचे कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी सांगितले.
अंधत्वामुळे या व्यक्तींना दैनंदिन जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते – घराबाहेर पडताना रस्त्यावरील अडथळे, वाहतुकीचा धोका, रात्रीच्या अंधारात अपघाताची भीती, सार्वजनिक ठिकाणी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ यांचा समावेश होतो. छोट्या कामांसाठीही दुसऱ्यांची मदत घ्यावी लागल्याने त्यांचा आत्मविश्वास कमी होतो आणि सामाजिक जीवनात सहभागी होणं कठीण होतं. या काठीच्या वापरामुळे अंध व्यक्तींना आजूबाजूची जाणीव राहते, ते अडथळ्यांपासून सुरक्षित राहतात आणि स्वावलंबीपणे चालू शकतात. रिफ्लेक्टीव्ह असल्यामुळे ही काठी रात्रीच्या अंधारात किंवा कमी प्रकाशातही इतरांना सहज दिसते, ज्यामुळे अपघातांची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.
यामुळे समाजात अंध व्यक्तींविषयी समज, सहानुभूती आणि जबाबदारीची भावना वाढीस लागते. ‘पांढरी काठी’ ही अंधत्वाची खूण नसून आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे, असा संदेश यातून दिला जातो. ही काठी अंध व्यक्तींना नवा आत्मविश्वास देऊन समाजात समानतेने वावरण्याची ताकद देते आणि “अंधत्व ही मर्यादा नसून योग्य साधनं मिळाल्यास तेही स्वावलंबीपणे जगू शकतात” हा सकारात्मक दृष्टिकोन दृढ करते.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सैनिक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सिंधुदुर्ग पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री सुनील राऊळ, रोटरी क्लब सावंतवाडीचे अध्यक्ष ॲड.सिद्धार्थ भांबुरे, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे, प्रोफेसर रुपेश पाटील, सिंधुदुर्ग साईकृपा अपंग बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल अध्यक्ष श्री अनिल शिंगाडे, सदस्य प्रकाश वाघ, ऑन कॉल रक्तदातेचे सचिव बबली गवंडी, कोकण संस्थेचे रिजनल मॅनेजर प्रथमेश सावंत, सत्यार्थ न्यूजचे व्हिडिओ एडिटर पत्रकार साबाजी परब आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट: सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांचा वाढदिवस आज सर्व अंध बांधवांच्या उपस्थतीत इथे केक कापून साजरा करण्यात आला. श्री विशाल परब यांच्या उत्तम आरोग्य, भरभराट आणि समृद्ध जीवनासाठी सर्वांनी यावेळी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला अवंती गवस, हनुमंत गवस, वैष्णवी म्हाडगूत, ऋचा पेडणेकर, गौरी आडेलकर, पद्माकर शेटकर आणि रोशनी चारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी तर आभार प्रथमेश सावंत यांनी मानले.
