Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

मुक्त विद्यापीठाचा अप्रेंटिसशिप बोर्ड सोबत सामंजस्य करार दोन नवीन शिक्षणक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग प्रशिक्षणाची संधी

नाशिक (प्रतिनिधी) – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचा (BOAT – बोट ) पश्चिम विभाग यांनी विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षणाच्या नव्या संधी खुल्या केल्या आहेत. मंगळवारी दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथे या दोन्ही संस्थांमध्ये या संदर्भात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात विशेष पूर्वतयारी व नियोजन करण्यात आले होते.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी – २०२०) नुसार पदवी शिक्षणक्रमात प्रत्यक्ष कार्यस्थळी प्रशिक्षण (ऑन-जॉब ट्रेनिंग) आणि संबंधित प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार मुक्त विद्यापीठाने बीबीए (पोर्ट मॅनेजमेंट) आणि बी.एस्सी. (इंडस्ट्रिअल ऑटोमेशन) हे दोन अप्रेंटिसशिप एम्बेडेड शिक्षणक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर शिक्षणक्रम आणि झालेला सामंजस्य करार यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच उद्योग क्षेत्रात कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे.

याप्रसंगी बोलतांना विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी नाशिक येथील विद्यापीठ आवारात बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंगचे सहाय्यता केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना उद्योग प्रशिक्षण आणि रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. बोर्डाच्या वतीने संचालक श्री. पी. एन्. जुमले यांनी बोर्डाच्या विविध योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्त विद्यापीठाबरोबर संयुक्तपणे काम करण्याची तयारी दर्शवली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची भावना वाढावी यासाठी बोर्डाचे अधिकारी सदर अभ्यासकेंद्रांमध्ये मार्गदर्शन सत्रे घेतील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यापीठाचे वित्त अधिकारी व प्रभारी कुलसचिव डॉ. गोविंद कतलाकुटे, संगणकशास्त्र विद्याशाखेचे संचालक श्री. माधव पळशीकर, महाज्ञानदीपचे प्रमुख प्रा. गणेश लोखंडे, ग्रामीण विकास व उद्योजकता विभागाचे प्रमुख प्रा. कैलास मोरे यांच्यासह बोर्डाचे उपसंचालक श्री. एन. एन. वडोदे, सहाय्यक संचालक डॉ. प्रविण उके, श्री. व्ही. व्ही. देशमुख आणि श्री. एन्. सी. गांगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |