नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या योग शिक्षणक्रमाची विद्यार्थिनी कु. मयुरी विजय शेलार हिने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये आपले नाव नोंदवले आहे. तिने केवळ ३० सेकंदात ४७ ‘चक्रासन पुश-अप्स’ करण्याचा विक्रम करून दाखवला आहे.
कु. मयुरी मुक्त विद्यापीठाच्या पुणे येथील न्यू एज्युकेशन सोसायटी अभ्यास केंद्राची विद्यार्थिनी आहे. तिने याआधी मुक्त विद्यापीठाचा योगशिक्षक पदविका शिक्षणक्रम पूर्ण केला असून सध्या ती विद्यापीठाचाच एम.ए. योग (प्रथम वर्ष) शिक्षणक्रम शिकत आहे. कु. मयुरीने दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी हा पराक्रम केला. ज्यास नुकतीच 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अचिव्हर' म्हणून मान्यता मिळाली आहे. या विक्रमासाठी तिला न्यू एज्युकेशन सोसायटी अभ्यास केंद्रप्रमुख डॉ. गिरीश धडफळे, योगशिक्षिका श्रीमती सुवर्णा भापकर तसेच सानिका बाम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’च्या प्रतिनिधी तथा रेकॉर्ड मॅनेजर मानसी सतेजा यांनी या विक्रमाची नोंद केली.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले, प्रभारी कुलसचिव तथा वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, पुणे विभागीय केंद्र संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड व आरोग्य विज्ञान विद्याशाखा संचालिका डॉ. रश्मी रानडे यांनी या विक्रमाबद्दल कु. मयुरी शेलारचे अभिनंदन केले आहे.
आपल्या या यशाबद्दल बोलताना मयुरीने आनंद व्यक्त करत म्हटले की, "मुक्त विद्यापीठातून योग डिप्लोमा आणि एम.ए. योग करत असताना मला खूप काही शिकायला मिळत आहे. अभ्यासकेंद्रातील शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले. मी याबद्दल सर्वांची आभारी आहे."
