Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

नवी मुंबई महानगरपालिकेने 7 महिन्यांत 500 कोटी 11 लाख रुपयांचा मालमत्ताकर केला वसूल

डिजिटल पेमेंट्स सुविधा आणि जनजागृती मोहीमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ - आयुक्त डॉ. कैलास शिंदे

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल ते ऑक्टोबर या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५०० कोटींपेक्षा अधिक कर संकलन करून लक्षणीय कामगिरी केली आहे. कर संकलनातील ही झेप लोकाभिमुख उपक्रम, डिजिटल पेमेंट्सला दिलेले प्रोत्साहन तसेच करदात्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध जनजागृती मोहिमांमुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे शक्य झाले असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे सांगितले आहे. नवी मुंबई महानगरपालिका पारदर्शक आणि कार्यक्षम कारभारासाठी कटिबद्ध असून, या उत्पन्नाचा उपयोग शहराच्या विकास कामांसाठी केला जाणार आहे असे सांगतानाच आयुक्तांनी करदात्या नागरिकांचे आभार मानले आहेत.

मालमत्ताकर विभागाच्या या यशामागे नागरिकांचा सहभागासोबतच तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नियोजनबद्ध धोरणे महत्त्वाची ठरली असून या उपाययोजनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे यांनी सांगितले. उर्वरित पाच महिन्याच्या कालावधीमध्ये कर वसूलीचे निश्चित केलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आयुक्त महोदयांच्या मार्गदर्शनानुसार योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे मालमत्ताकर विभागाचे उप आयुक्त डॉ.अमोल पालवे यांनी सांगितले.

कर संकलनाच्या वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम

कर संकलनात वाढ होण्यासाठी महानगरपालिकेने यंदा डेटा विश्लेषणावर आधारित नाविन्यपूर्ण पध्दतीने कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये करसंकलनात वाढ साध्य करण्यासाठी डेटा विश्लेषण, मालमत्ताधारकांची माहिती अद्ययावत करणे आणि जनजागृती मोहिमा राबविण्यात आल्या. या अंतर्गत माहितीचे सखोल विश्लेषण, कर संकलन मोहिमेचे धोरणात्मक नियोजन आणि माहिती संकलनासाठी विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन अशा सर्व घटकांच्या माध्यमातून करसंकलनात लक्षणीय वाढ झाली. याचा परिणाम म्हणजे, आत्तापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एका आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यांत ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कर संकलन झाले आहे, असे मालमत्ताकर विभागाने स्पष्ट केले.

ऑनलाईन कर भरण्यास नागरिकांकडून प्राधान्य

नागरिकांना घरबसल्या मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विभागाने डिजिटल पेमेंट पद्धतींचा प्रचार आणि प्रसार अधिक प्रभावीपणे केला. व्हॉट्सॲप चॅटबॉट (८२९१९२०५०४), ‘My NMMC – माझी नवी मुंबई’ ॲप, महानगरपालिकेची www.nmmc.gov.in ही अधिकृत वेबसाईट, कर देयकांवरील क्यूआर कोड (QR Code) स्कॅनिंग तसेच विविध युपीआय माध्यमांद्वारे पेमेंट करण्याची सुविधा - यांसारख्या ऑनलाईन पर्यायांचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर वापर केला. ऑनलाईन करभरणा माध्यमातून रू.३१३ कोटी ७० लाख इतक्या मोठ्या प्रमाणात कर संकलन झाले.

आगामी काळात थकबाकीदारांना मालमत्ताकर भरण्याच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी महानगरपालिकेने आता मालमत्ता जप्तीची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार थकबाकीदारांनी मालमत्ता कर भरून थकबाकीची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे.

असा वसूल झाला मालमत्ता कर !

* नमुंमपाच्या आठ विभागांतील १ लाख ६३ हजार २३ मालमत्ताधारकांकडून ५०० कोटी ११ लाख रुपयांचे कर संकलन झाले.

* सर्वात जास्त मालमत्ता कर नेरूळ विभागातून जमा झाला : १०६ कोटी ७९ लाख रुपये

* ऑनलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : ३१३ कोटी ७० लाख रुपये

* ऑफलाईन माध्यमांतून झालेले कर संकलन : १८६ कोटी ४१ लाख रुपये

मालमत्तेच्या प्रकारानुसार झालेले कर संकलन

* निवासी मालमत्ता : ३५ टक्के

* अनिवासी / व्यावसायिक मालमत्ता : २३.८४ टक्के

* औद्योगिक मालमत्ता : ३२.४५ टक्के

* मिश्र व इतर मालमत्ता : ८.७१ टक्के

नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्दिष्ट केवळ कर संकलनात वाढ करणे नाही, तर नागरिकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिक सोयीस्कर व सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हे आहे. भविष्यात स्मार्ट सिटी संकल्पनेशी सुसंगत असे अधिक डिजिटल उपक्रम राबविण्याचे नियोजन केले असून ज्यायोगे नागरिकांचा वेळ वाचेल आणि कामकाज अधिक पारदर्शक बनेल. करसंकलनातील हे यश केवळ महानगरपालिकेचे नाही, तर प्रत्येक जबाबदार करदात्याचे आहे. नागरिकांनी वेळेवर कर भरून दाखवलेली जबाबदारीची जाणीव आणि विश्वास समाधानकारक असून शहर विकासाला हातभार लावणारा असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |