Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

“जिल्ह्यातील सर्व शाळा स्मार्ट शाळा करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे


जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक संपन्न

“स्मार्ट आरोग्य केंद्र निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा” — खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

 ठाणे - जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली आज, दि. १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक संपन्न झाली.

जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास करण्यासाठी दिशा समिती बैठक आयोजित करण्यात आली असून योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी ही बैठक महत्त्वाची आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत राबविणाऱ्या योजना विविध विभागांना दर्जेदार पायाभूत सुविधांची कामे सुनिश्चित करून आणि योजना त्यांच्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

तसेच प्रधानमंत्री आवास योजना संदर्भात कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी प्रशासनाने लोकप्रतिनिशीं चर्चा करणे आणि योग्य मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील रहावे, तसेच जिल्ह्यातील सर्व शाळा ‘स्मार्ट शाळा’ करण्यासाठी १०० कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या. जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

यावेळी इ-वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. मलंगगड, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्हयातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे नमूद केले. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी ऍक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.

२७ गावातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळा कल्याण डोंबिवली महापालिकेत समायोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त आशिष गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२९ शाळा असुन प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व शाळा दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १२ टक्क्यांनी पटसंख्या वाढ झाली आहे. तसेच दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावले आहे. ५७ कोटी ७५ लाख निधी उपलब्ध होता आणि त्याअंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यात आली असून नाविन्य पुर्ण योजनेचा निधी व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी देखील शाळा दुरुस्तीसाठी तसेच शाळा स्मार्ट तयार करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करण्यासाठी सुचना दिल्या.

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा प्रशासनासंदर्भांतील कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी उद्देश समोर ठेवून कामकाज करण्याबाबत प्रास्ताविकात सांगितले.

यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के, खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा - सुरेश गोपीनाथ म्हात्रे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, विधानसभा सदस्य कुमार आयलानी, विधानसभा सदस्य राजेश मोरे, विधानसभा सदस्य सुलभा गणपत गायकवाड, आयुक्त नवीमुंबई महानगरपालिका डॉ.‌ कैलास शिंदे, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) डॉ. डी. एस. स्वामी, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका संदिप माळवी, पोलिस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

या बैठकीत पंतप्रधान आवास योजना शहरी (PMAY-U), स्वच्छ भारत मिशन (SBM), स्मार्ट सिटी मिशन, अमृत योजना, सर्व शिक्षा अभियान (SSA), मिड-डे मील स्कीम, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, आदर्श ग्राम योजना, जल जीवन मिशन या अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणी आणि संचालनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश गणपत म्हस्के यांनी दिशा समिती मार्फत जलद गतीने कामकाज पुर्ण करण्यासाठी सुचना दिल्या आणि केंद्र शासनाच्या योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच पंतप्रधान आवास योजना शहरी भागात राबविण्यासाठी ठाणे महापालिकेने विशेष प्रयत्न करण्यात यावे, असे मार्गदर्शन केले.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी दिशा समिती काम करत असते आणि यासाठी दिशा समितीमार्फत नियंत्रण असणे गरजेचे आहे. जल जीवन मिशन योजना, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण विभागातील कामकाज वेगाने होण्यासाठी पाठपुरावा करून कामकाज सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती बाळ्या मामा- सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |