ठाणे,दि.29 :- ठाणे जिल्ह्यात स्वदेस फाऊंडेशनच्या विकास कार्याचा शुभारंभ शहापूर येथील शेटे हॉलमध्ये कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते मंगळवार, दि.28 ऑक्टोबर 2025 रोजी संपन्न झाला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे तसेच स्वदेस फाऊंडेशनचे वरिष्ठ संचालक राहुल कटारिया आणि ठाणे जिल्हा व शहापूर तालुक्यातील विभागप्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले. त्यानंतर स्वदेस फाऊंडेशनचे उपसंचालक प्रसाद पाटील यांनी ‘स्वप्नातील गाव’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी स्वदेस फाऊंडेशनची ध्येय धोरणे, ‘स्वप्नातील गाव कार्यक्रम’ व आगामी विस्ताराबाबत सांगितले की, ‘स्वप्नातील गाव’ कार्यक्रमात ग्रामविकास समित्या संपूर्ण जबाबदारी स्वीकारून कार्य करतात, ज्यामुळे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होतो. या उपक्रमातून रायगड व नाशिक जिल्ह्यात 250 हून अधिक गावे ‘स्वप्नातील गाव’ म्हणून विकसित झाली आहेत. स्वदेस फाऊंडेशन आता शहापूर तालुक्यातील गावांमध्ये गाव विकास समिती स्थापन करून कार्य सुरू करणार आहे.
कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी स्वदेस फाऊंडेशनच्या तळागाळातील कार्याचे कौतुक करीत, शहापूर तालुक्याच्या ग्रामपरिवर्तनासाठी सर्व शासकीय अधिकाऱ्यांनीदेखील सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच स्वदेस फाऊंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला, झरीना स्क्रूवाला, स्वदेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे आणि संपूर्ण स्वदेस टीमचे ग्रामीण सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ आणि प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी स्वदेस फाऊंडेशनबरोबर भागीदारीसाठी जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व विभागांकडून संपूर्ण सहकार्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
शहापूर तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी आपल्या मनोगतात इगतपुरी तालुक्यातील स्वदेस फाऊंडेशनच्या यशस्वी कामाचा उल्लेख करून त्यांच्या अनुभवांची माहिती दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसिलदार परमेश्वर कासुळे आणि गटविकास अधिकारी श्री. बी.एच. राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच स्वदेस फाऊंडेशनचे व्यवस्थापक रविंद्र राऊत, अरविंद पाताडे आणि विठ्ठल कुंदेकर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या शेवटी गटविकास अधिकारी श्री.बी.एच. राठोड यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

 
 
 
.jpg) 
 
.jpg) 

