मुंबई, दि. २८ : नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५’ मधील तरतुदीनुसार १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० पर्यंत असेल.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे १ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.
