‘मोगरा फुलला’ या कार्यक्रमांचे वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात २७ नोव्हेंबरला आयोजन
मुंबई, दि. २६ : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विशेष सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन सांस्कृतिक कार्य विभागामार्फत करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये मोगरा फुलला, ज्ञानेश्वर माऊली, विद्वत्त परिषद, परदेशातील कार्यक्रम, इतर राज्यांमध्ये आयोजित होणारे विशेष सोहळे, ज्ञानेश्वर माऊली स्मरणार्थ नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशन याच्यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे.
या मालिकेतील प्रमुख आकर्षण असलेला ‘मोगरा फुलला’ या उद्घाटनाच्या भव्य आध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन २७ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० ते ९.०० या वेळेत विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी, नवी मुंबई येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात गणेश शिंदे व संच यांचे विशेष सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाची संकल्पना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व रसिक प्रेक्षकांनी या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.
