काटई–देसाई पुलाच्या कामातील विलंबामुळे वाहतूक कोंडी तीव्र
डोंबिवली : निळजे रेल्वे व नदीवरील काटई ते देसाई पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी हिंदू धर्माभिमानी संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. नवीन पर्यायी पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना निळजे रेल्वे पूल अचानक पाडण्यात आला, ही नेमकी कोणत्या घाईत घेतलेली निर्णय प्रक्रिया होती,असा गंभीर प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.
या पुलाच्या तोडकामानंतर संपूर्ण वाहतूक कल्याण–शिळं मार्गावर वळविण्यात आल्याने परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी तर परिस्थिती अधिकच बिकट होत असून वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत आहे. उकाड्याने तापलेल्या वातावरणात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून या मार्गावरून प्रवास करणे नागरिकांसाठी मोठा मनस्तापदायक ठरत आहे. धुळीमुळे आरोग्याचेही प्रश्न वाढत आहेत.
स्थानिक नागरिक, व्यावसायिक तसेच वाहनचालक यांनी प्रशासनाला तातडीने ध्यान देण्याचे आवाहन केले आहे. पुढील दुर्घटना किंवा आरोग्यविषयक अडचणी टाळण्यासाठी पर्यायी पूल व मुख्य पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
