डोंबिवली ( शंकर जाधव ) : कर्ज, क्रेडिट कार्ड, खाती आणि गुंतवणूक उत्पादनांसारख्या बँकिंग सेवा पुरवण्यासाठी एक विशिष्ट केंद्राची मागणी डोंबिवली व कल्याणकर यांच्याकडून आयडीबीआय बँकेकडे होत होती. त्यानुसार उच्च तंत्रज्ञान आणि मुबलक मनुष्यबळ आणि सुलभ सोयीयुक्त आयडीबीआय बँकेच्या रिटेल असेट सेंटरचे उदघाटन शुक्रवारी झाले. डोंबिवली एमआयडीसी व कल्याण येथे नवीन रिटेल असेट सेंटर आणि ग्राहक सेवा साधण्यात आयडीबीआय बँकेला यश आले आहे.
सदर शाखेचे उद्धाटन सुमित फक्का (उप व्यवस्थापकीय संचालक, आयडीबीआय बँक) यांच्या शुभहस्ते झाले यावेळी डॉ. कुमार नील लोहित ,(कार्यकारी संचालक, आयडीबीआय बँक) हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी विभागातील अनेक नामांकित बिल्डर्स, मान्यवर, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमित फक्का यांनी आयडीबीआय बँकेच्या व्यवसायविकास, जलद कर्जप्रक्रिया आणि तंत्रज्ञानाधारित सेवांद्वारे उन्नत ग्राहकसेवा यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचे नमूद केले. तसेच बँकेच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून रिटेल व्यवसायवृद्धीसाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले.
या नवीन रिटेल असेट सेंटरमुळे ग्राहकांना जलद सेवा मिळण्यास मदत होणार असून, कल्याण–डोंबिवली परिसरातील कर्ज प्रक्रियेला अधिक सुलभता व वेग मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
