ठाणे दि.12 नोव्हेंबर : ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील अति दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदिवासी बहुल अशा फुगाळे गावातील आदिवासी बांधवाना व गरजू महिला व पुरुषांकरीत्ता ग्रामीण विभाग, वैद्यकीय सेवा संस्था, कुर्झे यांच्या वतीने शनिवारी दि.07 नोव्हेंबर रोजी मोफत रोगनिदान व उपचार शिबिर संपन्न करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमात फुगाळे ग्रामपंचायतीचे सरपंच जिवा आनंदा भला, पोलीस पाटील शिवाजी भला, कसारा गावचे पोलीस पाटील अशोकराव कर्डक हे उपस्थित होते तसेच संस्थेचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ वाघमारे, डॉ रमेश राठोड, डॉ. आर्यचाणक्य भोळे, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.भोळे मॅडम आदीनी गावातील गोर गरीब, शेतकरी, मजुरी करणाऱ्या उपस्थित महिला व पुरुषांची सर्व रोग आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर मोफत प्राथमिक उपचार केले.
उपस्थित वयोवृद्ध महिला व पुरुषांची नेत्ररोग तपासणी करून उपचार व मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू, गरोदर माता मृत्यू यांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वयंप्रेरनेने आशा कार्यकर्त्या सुमन पारधी, अंगणवाडी सेविका मंदा भला आणि मदतनीस यांना प्राथमिक उपचाराचे साहित्य व किट चे मोफत वाटप करण्यात आले. तसेच संस्थेच्या वतीने उपस्थिंताना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सेवा आणि प्रथमोपचार करण्याचा वसा घेतलेल्या ग्रामीण विभाग वैद्यकीय सेवा संस्थेचे कार्य पालघर व ठाणे जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरु असलेल्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
ठाणे जिल्ह्यातील दुर्गम डोंगर दऱ्यात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी पाड्यावरील आदिवासी बांधवाना साथीचे आजार, त्वचा रोग आदी आजारावर उपचार करण्यासाठी वाहतुकीची सुविधा कमी असल्याने शहरात जाणे सोईचे नसल्याने आमच्या संस्थेकडून ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांचे गावात मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहेत. तसेच परिसरात बालमृत्यू, कुपोषणाचे प्रमाण कमी करून चांगल्या वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्याचा आमच्या संस्थेचा मानस असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. माधव वाघमारे यांनी यावेळी बोलताना दिली.
