प्रभाग क्रमांक 7 मध्ये संदीप गायकर यांच्या संकल्पनेतून सीसीटीव्ही वितरणाला प्रारंभ
कल्याण दि.8 नोव्हेंबर : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर कल्याण डोंबिवलीसाठी सुसज्ज आणि अद्ययावत रुग्णालय उभारण्याची ग्वाही भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे. स्थायी समितीचे माजी सभापती संदीप गायकर यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक 7 मध्ये राबविण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.
कल्याण डोंबिवलीसाठी एका चांगल्या शासकीय रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. चांगली आरोग्य सुविधा आपल्याकडे उपलब्ध नसल्याने आपल्याकडील गरीब आणि गरजू रुग्णांना ठाणे - मुंबईतील रुग्णालयांमध्ये पाठवावे लागत आहे. तिकडे जाण्यासाठी लागणारा वेळ पाहता रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले तर चांगल्या रुग्णालयाची आम्ही तातडीने उभारणी करू असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. यापूर्वी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर, उपमहापौर होते, परंतु एकहाती सत्ता नसल्याने आम्हाला मर्यादा होत्या. परंतु आता केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार अत्यंत सक्षमतेने सांभाळत आहेत. त्यांच्याकडून अनेक जनहिताचे निर्णय, विकासकामे अतिशय वेगाने सुरू असल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रभागात लोकप्रतिनिधींकडून सीसीटीव्ही वाटप करण्याची राज्यातील पहिलाच उपक्रम...
नुकत्याच झालेल्या भाऊबीजेच्या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती आणि नगरसेवक संदीप गायकर यांनी प्रभागांमध्ये स्वखर्चातून सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत ठाणे, असो मुंबई असो की पुणे, या कोणत्याही ठिकाणी अशा प्रकारचा उपक्रम कोणीही राबविला नसल्याचे सांगत नरेंद्र पवार यांनी संदीप गायकर यांच्या संकल्पनेचे कौतुक केले.
नुकत्याच झालेल्या त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त या सीसीटीव्ही वितरण उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 7 मधील साईबाबा नगर, मारुती मंदिर ढगे चाळ तसेच संतोषी माता मंदिर, शिवाजी नगर, शिवाजी मित्र मंडळ, पारिजात चाळ आणि शिवाजी नगर या भागांमध्ये अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हे सीसीटीव्ही वितरण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक संदीप गायकर, भाजपा जुने कल्याण मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हेमलता पवार, महिला मोर्चा प्रदेश सचिव प्रिया शर्मा, माजी नगरसेविका वैशाली पाटील, भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ.पंकज उपाध्याय, उद्योजक शामल मंगेश गायकर, राजेश ठाणगे, संदीप गडगे, चंदू बिरारी, गणेश हिरे, प्रशांत महाजन, रोहित लांबतुरे, विवेक कुलकर्णी, भारती सातपुते, रोहित कुलकर्णी, दिपक दोरलेकर, समृद्ध ताडमारे, भगवान म्हात्रे, सदा कोकणे, तसेच परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
