नाशिक (प्रतिनिधी) :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्याच्या हिवाळी परीक्षा येत्या दिनांक ०७ जानेवारी २०२६ पासून सुरु होत आहेत. त्यामुळे माहे जानेवारी व जुलै सत्रात प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर शिक्षणक्रमांच्या विद्यार्थ्यांनी येत्या दिनानक १५ डिसेंबर २०२५ पर्यत ऑनलाईन गृहपाठ सादर करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन / अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेले गृहपाठ ऑनलाईन अपलोड करणे, त्याचे मूल्यांकन विद्यार्थी ज्या अभ्यासकेंद्रावर प्रवेशित आहे, त्या अभ्यासकेंद्रावरील समंत्रक/शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यप्रणाली विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्र – कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांच्या नियोजनानुसार परीक्षा विभागाने विकसित केलेली आहे. मागील दोन वर्षापासून या कार्यप्रणालीचा वापर यशस्वीपणे विद्यार्थी व अभ्यासकेंद्राकडून केला जात आहे. या कार्यप्रणालीमध्ये विद्यार्थ्याने आपल्या कायम नोंदणी क्रमांकाच्या (पीआरएन) आधारे लॉगीन करून, विषयनिहाय वैयक्तिक माहिती असलेली उत्तरपुस्तिका डाऊनलोड करून या उत्तरपुस्तिकेमध्ये असलेल्या गृहपाठाचे प्रश्न आपल्या हस्ताक्षरामध्ये लिहून त्या पीडीएफ स्वरुपात पोर्टलवर विषयनिहाय अपलोड केल्यानंतर, अभ्यासकेंद्रावरील पात्र समंत्रक त्याचे ऑनलाईन मूल्यमापन करत असतात.
परीक्षा विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी ऑनलाईन गृहपाठ हे येत्या दिनांक १५ डिसेंबर २०२५ पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे. तसेच अभ्यासकेंद्रावरील कार्यरत समंत्रकांनी गृहपाठाची तपासणी विहित मुदतीत करावी. जेणेकरून, विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. अन्यथा, अशा विद्यार्थ्यांना संबंधित विषयास अनुपस्थित दर्शवून निकाल जाहीर करण्यात येईल. ज्या शिक्षणक्रमांचे गृहपाठ ऑनलाईन सादर करावयाचे आहेत, त्याची यादी तसेच ऑनलाईन गृहपाठ सादर करण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना, कार्यपद्धतीची पीपीटी व व्हिडीओ http://asm.ycmou.org.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी ०८०७११८८७८९, ८००७२५३०४४, ८०५५२५३०७२ या मदत क्रमांकावर किंवा oasishelpdesk22@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा. तसेच मुदतीपूर्वीच ऑनलाईन गृहपाठ सादर करावेत व संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे आवाहन परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे.
