डोंबिवली : भरधाव ट्रकच्या जोरदार धडकेत एक अडीच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची डोंबिवली पूर्वेकडील सोनारपाडाजवळील डीएनसी बँकेजवळ शनिवार 1 तारखेला रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. ट्रकचालकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कविश जयंत झांबरे असे अपघातात मृत्यू पावलेल्या बालकाचे नाव आहे.
फिर्यादी जयंत झांबरे हे शनिवारी रात्री आठच्या सुमारास गोळवली येथील पंपावर पेट्रोल भरून त्यांच्या एम एच ०५/जी बी/ ६६७० क्रमांकाच्या बुलेटवरून घराकडे चालले होते. त्यांचा मुलगा कविश हा मोटरसायकलीच्या पाठीमागील सीटवर बसला होता. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास सोनारपाड्यासमोरील डीएनएस बँक चौकात येताच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात चाललेल्या एमएच १९/ सी वाय /२००६ क्रमांकाच्या हायवा ट्रकने पाठीमागून मोटरसायकलाजोरदार धडक दिली. त्यामुळे जयंत यांच्या मागे बुलेटवर बसलेला कविश रस्त्यावर पडला आणि ट्रकच्या पुढील चाकाखाली येऊन जागीच मृत्यू पावला. ट्रकचालक येथेच ट्रक तेथेच सोडून पळाला.
मानपाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर बालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रूग्णालयाकडे पाठवून दिला. पोलिसांनी रेती/कचने भरलेला ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. या घटनेनंतर कविश राहत असलेल्या नांदिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर कविशच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रक ड्रायव्हरचा सहाय्यक पोलिस निरीक्षक देवीदास ढोले शोध घेत आहेत.
या प्रकरणी दुर्दैवी कविशचे वडील जयंत भगवान झांबरे (३६) यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१ सह मोटार वाहतूक कायद्याचे कलम १८४ अन्वये हायवाच्या फरार ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
