उरण दि १२( विठ्ठल ममताबादे ) : उरणच्या जे एन पी ए बंदरातील ए पी एम टर्मिनल म्हणजेच जी टी आय बंदराच्या सी एस आर फंडामधून निरामय हेल्थ फाऊंडेशन माटुंगा मुंबई याच्या माध्यमातून उरणच्या पुर्व भागातील पुनाडे ग्राम पंचायत हद्दीतील महिलांसाठी अँडव्हान्स शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत. या कोर्सचे औपचारिक उद्घाटन आज करण्यात आले .
पुनाडे गावातील ज्या महिलांकडे शिलाई मशीनची उपलब्धता आहे अशा सुमारे २२ महिलांना ही प्रशिक्षण देण्यात आले. पुनाडे ग्राम पंचायत कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात निरामय हेल्थ फाउंडेशनच्या शुभलक्ष्मी पटवर्धन यांनी महिलांशी अतिशय सहज सोप्या भाषेत संवाद साधून त्यांच्या दैनंदिन जीवनात फावल्या वेळेत कशाप्रकारे अँडव्हान्स प्रकारे टेलरिंगच्या कामातून संसाराला हातभार लावू शकता याचे खास विवेचन केले यावेळी बोलताना संस्थेच्या मुख्य संचालिका शुभलक्ष्मी पटवर्धन म्हणाल्या की आमच्या सारख्या समाजसेवी संस्था असतात त्या असे कार्यक्रम करीत असतात त्याला लागणारे आर्थिक पाठबळ हे ए पी एम टर्मिनल कडून मिळत असते. मी हे पाहिले आहे की नेदरलँड या देशामध्ये २१ वर्षानंतर महिलेला घरी बसण्याची परवानगीच नाहीय त्या देशातील प्रत्येक महिला काही ना काही काम करणे सक्तीचे करण्यात आले आहे. बाळंतपणा नंतर देखील केवळ एक वर्षानंतर त्यांना किमान ४ तास तरी काम करावे लागत असते. त्यातून त्या देशाने मोठ्या प्रमाणात प्रगती साधल्याचे पाहायला मिळत आहे . आपण देखील आपल्यातील गुणांना वाव मिळवायचा असेल आपले व्यक्तिमत्व खुलवायचे असेल तर काहीसे संसाराला हातभार लागणारे कामांकडे लक्ष दिले गेले पाहिजे ज्या माध्यमातून आपल्याला आपले व्यक्तिमत्व खुलावण्याबरोबरच महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत होऊ शकणार आहे असे शुभलक्ष्मी पटवर्धन यांनी सांगितले. या निमित्ताने पुनाडे येथील ग्राम पंचायतीच्या सभागृहामध्ये शनिवार पासून पुढील आठ आठवड्यांचे अँडव्हान्स शिलाई मशीनचे क्लासेस घेण्यात येणार आहेत . दर शनिवारी दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत या माध्यमातून येथील गरजू महिलांना अँडव्हान्स शिलाई मशीनवर काम कसे करायचे , कशाप्रकारे नव्या फॅशनचे कपडे शिवता येतील याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
हे प्रशिक्षण सुचिता जोशी या प्रशिक्षिती शिक्षिका देणार आहेत. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून ए पी एम टर्मिनल्स म्हणजेच जी टी आय बंदराच्या वतीने येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत उपयोगी येणारे बौद्धिक खेळांसाठीचे साहित्य वाटप करण्यात आले तर विद्यार्थ्यांना देखील प्रत्येकी भेट्वस्तूचे ही या निमित्ताने वाटप करण्यात आले .
कार्यक्रमाला जी टी आय म्हणजेच ए पी एम टर्मिनलच्या सी एस आर विभागाचे अधिकारी केविन गाला , सम्रीती भेळे , सुहासिनी लोहकरे आणि अनामिका दास उपस्थित होते तर निरामय हेल्थ फाउंडेशनच्या डॉ. क्षमा निकम , दिप्ती पाणेकर , प्रकल्प समन्वयक सरोज सूर्यवंशी पुनाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकारी सुप्रिया घरत ,काही ग्रामपंचायत सदस्या आणि ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यानी सुरेख असे स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले तर तुळशीचे रोप देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
