विद्या विकास मंदिर, आंदगाव येथे सौर प्रकल्प; शिक्षण, निसर्ग आणि शाश्वततेचा उज्ज्वल भविष्यकाळ
पुणे- आधुनिक युगात माणूस प्रगतीच्या शिखरांकडे धावत असताना निसर्ग, पर्यावरण आणि शाश्वततेच्या मूल्यांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसते. अशा परिस्थितीत पर्यावरणपूरक आणि निसर्गाशी सुसंगत उपक्रम राबविणे ही काळाची गरज बनली आहे. या जाणिवेतून आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी डेटा एक्सेल इंडिया यांच्या सी एस आर निधीतून दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी विद्या विकास मंदिर, आंदगाव येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला होता. हा प्रकल्प केवळ वीजपुरवठ्याचा पर्याय नसून विद्यार्थ्यांना शाश्वत जीवनशैलीची प्रेरणा देणारा उपक्रम ठरला आहे.
या कार्यक्रमात डेटा एक्सेल इंडिया चे सी.टी.ओ. व एमडी श्री. विशाल भसीन आणि त्यांच्या पत्नी दिव्यानी भसीन, सिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर अतिश बुधे, असोसिएट – लिस्ट कन्व्हर्जन ऐश्वर्या पोकळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. तसेच डेटा एक्सेल इंडिया कंपनीचे इतर मान्यवर देखील उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, पर्यावरणीय जबाबदारी आणि भविष्याच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरवात शाळेचे मुख्यध्यापक श्री. सतीश सावंत सर यांनी मान्यवरांचे स्वागत करून केले. तर सौर प्रकल्पाचे उद्घाटन डेटा एक्सेल इंडिया कंपनीचे श्री. शार्दुल जाधव व प्रियांका मॅडम यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या संपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीत कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे विशेष योगदान लाभले. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी कोकण संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक प्रीती पांगे, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर- निकिता कंटाळे, आणि सामाजिक कार्यकर्ते- विष्णू ठाकरे यांनी मोलाची भूमिका बजावली. या सौर प्रकल्पामुळे शाळेच्या दैनंदिन वीजेच्या गरजा नवीकरणीय ऊर्जेद्वारे पूर्ण होतील, विजेच्या खर्चात बचत होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणसंवर्धनाची जाणीव अधिक दृढ होईल.
कार्यक्रमाच्या शेवटी कोकण एनजीओचे अजिंक्य शिंदे यांनी डेटा एक्सेल इंडिया कंपनी, शाळा प्रशासन आणि सर्व सहकार्य करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सौर ऊर्जा प्रकल्प ग्रामीण शाळांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
