- वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
- सावित्रीबाई फुले नाट्यगृह नूतनीकरण भूमिपूजन
- प्रेरणा वॉर मेमोरिअल सेंटरचे उदघाटन
- खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने प्रकल्प मार्गी
डोंबिवली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलाच्या टप्पा - १ ची उभारणी करण्यात येणार आहे. तर १५ कोटी रुपयांच्या निधीतून सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी करण्यात येणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कामे आज मार्गी लागत आहेत. याचसमवेत क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उदघाटन करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची ही यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणात शनिवार ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मतदारसंघात मागील दहा वर्षाच्या कालावधीत विविध शहरांमध्ये अनेक क्रीडा सुविधा उभ्या राहिल्या असतानाच आता डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा विकास दृष्टीपथात आला आहे. या संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीच्या कामाला आता सुरुवात होत आहे. सुमारे १८० कोटी रुपयांच्या निधीतून क्रीडा संकुलांची पहिल्या टप्प्याची उभारणी केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने या क्रीडा संकुलाचे काम प्रगतीपथावर जात आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. यामध्ये विविध खेळांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या क्रीडा संकुलाच्या उभारणीच्या टप्पा १ मधे इंडोर क्रीडासंकुल आणि ऑलिंपिक दर्जाचा तरणतलाव उभारण्यात येणार आहे. तर टप्पा २ मध्ये स्टेडियम उभारण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील खेळाडूंना विविध खेळांच्या सरावासाठी अत्याधुनिक सुविधांनी आणि साहित्यांनी सुसज्ज असे हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. याचे शनिवार, ६ डिसेंबर रोजी भूमिपूजन पार पडणार आहे.
तर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पायाभूत सुविधा, सांस्कृतिक विकास व नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांसाठी नुकतीच भरीव निधीची तरतूद करण्यात आली होती. यात डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील कला रसिकांची भूक भागवणाऱ्या सावित्रीबाई जोतीराव फुले नाट्यगृहाच्या पुनर्विकासासाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून या कामाचे देखील शनिवारी भूमिपूजन पार पडणार आहे. तर याचसमवेत क्रीडा संकुलाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या प्रेरणा वॉर मेमोरिअलचे उदघाटन ही करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची ही यावेळी विशेष उपस्थिती असणार आहे. वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडांगणात शनिवार ६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे क्रीडा संकुल पुनर्विकासाचा महत्वाचा प्रकल्प साकार होत आहे. संपूर्ण कामकाज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) यांच्या निधीतून करण्यात येत असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या संकुलाची देखभाल व व्यवस्थापन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकाकडे सोपविण्यात येणार आहे. या आधुनिक क्रीडासंकुलात पंचवीस हजार चौ.मी. क्षेत्रफळाची बहुमजली क्रीडा इमारत उभारली जाणार आहे. त्याचसोबत एक हजार दोनशे पन्नास चौ.मी. क्षमतेचा आंतरराष्ट्रीय मानकांचा तरणतलाव, चारशे चौ.मी. डायव्हिंग पूल व प्लॅटफॉर्म, तसेच सोळा हजार चौ.मी. तळघर पार्किंगची सोय निर्माण केली जाणार आहे. या संकुलात इंडोर क्रीडा संकुलात योगा, जिमनॅशियम, बॅडमिंटन, टेबल टेनिस, कराटे, मार्शल आर्ट, जुडो, स्क्वॅश, स्नुकर, शूटिंग रेंज, जिमनॅस्टिक अशा विविध क्रीडा प्रकारांसाठी अत्याधुनिक सोयी उपलब्ध असतील. त्याचबरोबर आदरातिथ्य व निवास व्यवस्था, भव्य बॅक्वेट हॉल्स, आधुनिक फिजिओथेरपी केंद्र आणि बहुपयोगी सभागृह देखील या प्रकल्पाचा भाग आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचे स्थान असलेल्या या सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या विकासामुळे रसिकांना कलास्वाद घेताना आनंद होईल. सुसज्ज रंगमंच, प्रशस्त आसन व्यवस्था, अत्याधुनिक प्रकाश योजना, ध्वनी यंत्रणा, कॅन्टीन यासारख्या सोयी सुविधा या ठिकाणी नव्या पद्धतीने उभारण्यात येणार आहे.
