डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महत्त्वाच्या विकासकामांना गती देण्यासाठी राज्याच्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून तब्बल १६ कोंटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत पायाभूत सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय व नागरी सोयीसुविधा मजबूत करण्यासाठी विविध महत्त्वपूर्ण कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलकुंभ, पूल, सभागृह विकास, रस्ते कॉंक्रिटीकरण अशा कामांसाठीगी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यासाठी प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
कल्याण लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधांच्या उभारणींने जनसामान्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रत्येक क्षेत्रात भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. पायाभूत सुविधांपासून ते अत्याधुनिक सुविधांपर्यंत सर्वच विभागात प्रकल्पांची उभारणी करण्यात यश आले आहे. रस्ते. मेट्रो, रेल्वे, आरोग्य, पाणी, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, नाट्य व कला अशा सर्वच क्षेत्रातील प्रकल्पांसाठी निधी मिळवून आणणे आणि तो प्रकल्प तडीस नेणे ही डॉ. श्रीकांत शिंदे यांची कार्यपद्धतीने आहे.
याच कार्यपद्धतीला धरून कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुती सरकारकडून निधीची तरतूद सुरूच आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने राज्याच्या नगरविकास विभागाने कल्याण, डोंबिवली महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधांसह इतर प्रकल्पांसाठी भरघोस निधीची तरतूद केली आहे. नगरविकास विभागाच्या माध्यमातून ५ विकासकामांसाठी तब्बल १६ कोटींचा निधी मिळवण्यात यश आले आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर हा निधी प्राप्त झाला आहे. यामुळे या विभागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जुनी डोंबिवली परिसरातील प्रभाग क्रमांक ६४ साठी उंच जलकुंभ आणि पंप हाऊस बांधण्यासाठी ७ कोटी २४ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील वालधुनी नदीवरील पुलाच्या बांधकामासाठी १.७६ कोटींचा निधी देण्यात आला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील देविचा पाडा येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृह विकसित करण्यासाठी १.५० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. तर गोग्रासवाडी येथील रस्ते कॉंक्रिटीकरणासाठी ५० लाख, गरिबाचा वाडा ते ४५ मीटर रिंगरोड जोडणारा रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी ५ कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या उपलब्धतेमुळे महत्वाच्या रस्ते कॉंक्रिटीकरणाच्या आणि पूल बांधणीचा कामाला गती मिळणार आहे.
