Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

दृष्टिबाधित खेळाडूंना राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई, दि. 19 : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात विश्वविजेत्या संघातील खेळांडूचा सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाच्या कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाईंड इन इंडियाचे चेअरमन के. जी. महंतेश, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह संघातील खेळाडू उपस्थित होते. 

या खेळाडूंनी भारताचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार काढून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला. अंतिम सामन्यात निर्णायक विजय मिळवत भारतीय मुलींनी दृष्टिबाधित क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले. या विजयामुळे देशभर आनंदाचे वातावरण असून इतिहासात दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेटचे पहिले चॅम्पियन म्हणून भारताचे नाव कोरले गेले आहे. इतिहासात या विजयाची नोंद होईल. या यशामागे खेळाडूंनी घेतलेले अपार कष्ट, सातत्यपूर्ण सराव आणि अनेक अडचणींवर मात करण्याची जिद्द आहे. प्रत्येक खेळाडूची स्वतःची संघर्षकथा असून प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता त्यांनी सराव सुरू ठेवला. “कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती” हे वाक्य या संघाने प्रत्यक्षात उतरवले आहे.

संघाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल. तसेच खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र आणि कायमस्वरूपी मैदान व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी लागेल ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

देशात खेळ आणि खेळाडूंना मिळणारे महत्त्व वाढत आहे. पूर्वी खेळाला करिअर म्हणून कमी महत्त्व दिले जात होते; मात्र आता ही मानसिकता बदलत असल्याचे मत फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गंगा कदम महाराष्ट्राची लेक असली, तरी येथे उपस्थित असलेल्या सर्व खेळाडू भारताच्या लेकी आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना मदतीसाठी सहकार्य करू.

या खेळाडूंनी देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. पुढेही अशीच कामगिरी करत राहा; देश आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.

जिद्दीने विश्वचषक भारतात परत आणला – महंतेश


चेअरमन महंतेश म्हणाले की, या मुलींनी केवळ भारताला अभिमान वाटावा असे काम केले नाही, तर त्याहीपलीकडे जाऊन त्यांनी समाजाला प्रेरणा दिली आहे. दीपिका आणि तिच्या संपूर्ण संघाने जिद्द दाखवत विश्वचषक भारतात आणला. हा विजय संपूर्ण देशाचा आहे. दृष्टिबाधित खेळाडूंसाठी महाराष्ट्रात एक कायमस्वरूपी, दिव्यांग-सुलभ जागा उपलब्ध करून दिली जावी. अशी मागणीही त्यांनी केली.


वडिलांचे स्वप्न पूर्ण केले – उपकर्णधार गंगा कदम


यावेळी संघाची उपकर्णधार गंगा कदम यांनी भावना व्यक्त केल्या. राज्याच्या मुख्यमंत्री यांना भेटण्याची संधी मिळाल्यामुळे संपूर्ण संघाचा आत्मविश्वास वाढल्याचे सांगून ती म्हणाली की, मी मुख्यमंत्री महोदयांना भेटले होते. आज संपूर्ण टीम माझ्यासोबत आली आहे, हे पाहून खूप समाधान वाटते. माझ्या वडिलांची इच्छा होती की मी खेळात पुढे जावं. नियमित सराव करत असताना अचानक माझ्या वडिलांचे निधन झाले. त्या दुःखातून सावरायला मला वेळ लागला. त्यावेळी आता खेळ सोड, शिक्षण करून काहीतरी वेगळं कर असे अनेकांनी सांगितले. पण मला माहीत होतं की माझ्या वडिलांचं स्वप्न काय होतं. वडिलांच्या निधनानंतर १३ दिवसांनी मी पुन्हा सरावाला सुरुवात केली. तो निर्णय माझ्या आयुष्यातला सगळ्यात कठीण पण सगळ्यात महत्त्वाचा होता, असे सांगताना ती भावूक झाली.

२०१७ मध्ये नाशिक येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदा दृष्टिबाधित मुलींसाठी क्रिकेटची संधी मिळाली. तेव्हाच मला कळलं की आपल्यालाही संधी मिळाली तर आपण देशासाठी खेळू शकतो. अनेक अडचणी आल्या तरी आम्ही सराव थांबवला नाही. कारण खेळ आमच्यासाठी फक्त छंद नाही, तो आमचा आत्मसन्मान आहे. जर सरावासाठी योग्य मैदान, सुविधा आणि आर्थिक आधार मिळाला, तर आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकतो. महाराष्ट्र आणि देशासाठी अधिक पदकं जिंकू शकतो, अशा शब्दांत तिने भावना मांडल्या.

आम्ही मेहनत करू, शासन पाठिशी रहावे – कर्णधार दीपिका

संघाची कर्णधार कु. दीपिका म्हणाली की, आम्ही केवळ स्वतःपुरते नव्हे, तर आमच्या कुटुंबासाठीही पूर्ण जबाबदारीने उभे राहतो. घरखर्च, उपचार, शिक्षण आणि सराव या सगळ्यांची काळजी घ्यावी लागते. त्यामुळे नियमित आर्थिक सहाय्य मिळणे आमच्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. आमच्या संघातील खेळाडूंना आर्थिक सहाय्य देण्यात यावे. काही खेळाडूंना निवासाची सोय उपलब्ध करून देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आम्ही मेहनत करण्यास तयार आहोत. फक्त आधार आणि संधीची गरज आहे. सरकार आमच्या पाठीशी उभे राहील, हीच अपेक्षा आहे.

यावेळी क्रीडा आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी प्रास्ताविकात दृष्टिबाधित खेळाडूंनी दाखविलेल्या दुर्दम्य इच्छाशक्ती व मेहनतीचा उल्लेख करून या खेळाडूंचा अभिमान असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |