डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन
मुंबई, दि. २० : विज्ञान, शिक्षण आणि नवोन्मेषाच्या माध्यमातून समाजातील विषमता दूर करून मानव कल्याणाचा जागतिक संदेश देणारे पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर यांचे कार्य तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मता दिनाचे औचित्य साधून इटरनल कॉर्पोरेट मीडिया प्रा. लि. व Inspiring India यांच्या संयुक्त विद्यमाने ताजमहाल पॅलेस, कुलाबा, मुंबई येथे आयोजित ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व सुशिल बोर्डे यांच्या “More from Less for More : Innovation’s Holy Grail” या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री चंद्रकांतदादा पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT) चे एमेरिटस प्राध्यापक पद्मविभूषण प्रा. डॉ. एम. एम. शर्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश डी. अंबानी, बजाज ऑटो लिमिटेडचे अध्यक्ष निरज बजाज, गोडरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे चेअरमन व एम.डी. नादिर गोदरेज, मॅरिको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मरिवाला, काइनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन्सच्या संस्थापक व सीईओ सुलज्जा मोटवानी, इटरनल कॉर्पोरेट मीडिया प्रा. लि.चे चेअरमन कृपाशंकर तिवारी तसेच एमडी व सीईओ अलोक तिवारी यांच्यासह उद्योग, शिक्षण व संशोधन क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची संकल्पना मांडल्यानंतर ती प्रभावीपणे अंमलात आणण्यासाठी डॉ. माशेलकर यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण क्षेत्रातील अनेक बदल, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रातील राज्याच्या धोरणाबाबतही केलेल्या मार्गदर्शनामुळे नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य आज देशात अग्रस्थानी असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. माशेलकर यांनी मिळविलेल्या 54 डॉक्टरेट पदव्या हा देशातील अभूतपूर्व विक्रम असून साध्या पार्श्वभूमीतून जागतिक दर्जाचे वैज्ञानिक नेतृत्व उभे करणारा त्यांचा जीवनप्रवास युवकांसाठी दिशादर्शक असल्याचे श्री. पाटील म्हणाले. जागतिक स्तरावर सर्वोत्कृष्ट वैज्ञानिक म्हणून ओळख असलेल्या डॉ. माशेलकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास असाच सुरू राहीला, तर भविष्यात त्यांना नोबेल पारितोषिक व भारतरत्न पुरस्काराने सन्मान होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मता दिनाच्या संदर्भात बोलताना मंत्री श्री. पाटील म्हणाले की, राष्ट्रनिर्मितीसाठी एकात्मता, समावेशिता आणि सामूहिक जबाबदारी अत्यंत महत्त्वाची आहे. दारिद्र्य, विषमता आणि सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी विज्ञान, शिक्षण आणि नवोन्मेष प्रभावी ठरतात. “विषमता असूनही समान संधी निर्माण करणे” हा डॉ. माशेलकर यांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू असून तो युवक, स्टार्टअप्स, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात लवकरच जिओ विद्यापीठ सुरू होणार असून या माध्यमातून युवकांना जागतिकस्तरावर आपली ओळख निर्माण करता यावी यासाठी नवनवीन आणि आधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल मंत्री श्री. पाटील यांनी आयोजकांचे अभिनंदन करुन राष्ट्रीय सेवा व एकात्मतेच्या भावनेतून सर्व मान्यवरांनी दिलेल्या योगदानाचे विशेष कौतुक केले. ‘द प्राईड ऑफ इंडिया डॉ. रघुनाथ मालशेकर’ कॉफी टेबल बुक व ‘दिव्य वैज्ञानिक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या जीवन प्रवास उलगडून सांगितला व त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
