ठाणे, दि. 16 :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय हँडबॉल क्रीडा स्पर्धा 2025-26 चे आयोजन दि. 12 ते 14 डिसेंबर 2025 या कालावधीत आदर्श विद्यामंदिर, बदलापूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
स्पर्धेचे उद्घाटन दि. 13 डिसेंबर 2025 रोजी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण संचालक मनोज रेड्डी, आदर्श विद्यामंदिरचे मुख्याध्यापक रमेश बुटेरे, आदर्श महाविद्यालयाच्या प्राचार्य श्रीमती पांडे, ठाणे जिल्हा हँडबॉल असोसिएशनच्या चैताली चौधरी, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे सहसचिव सुनील सुरकुटे, महाराष्ट्र हँडबॉल असोसिएशनचे चेअरमन तथा पंच कमिटीचे सहसचिव राजेश गारडे, हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र व चेअरमन तांत्रिक कमिटी उपस्थित होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांमधून मुला-मुलींचे एकूण 16 संघ तसेच क्रीडा प्रबोधिनीचा एक संघ अशा 17 संघांतील सुमारे 320 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. उद्घाटक श्री. मारुती गायकवाड यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत मार्गदर्शन केले. ते स्वतः माजी खेळाडू असल्याने त्यांनी दिलेले मार्गदर्शन प्रेरणादायी ठरले.
ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंना उत्तम प्रतीचे ट्रॅकसूट देण्यात आले. तसेच स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघांना सन्मानचिन्हे व पदके प्रदान करण्यात आली. यासोबतच प्रत्येक विजयी खेळाडूला “स्मार्ट वॉच” देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत 14 वर्षांखालील मुलांच्या गटात क्रीडा प्रबोधिनीने प्रथम क्रमांक, नाशिक विभागाने तर पुणे विभागाने तृतीय क्रमांक पटकावाला. तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने प्रथम, नाशिक विभागाने द्वितीय तर मुंबई विभागाने तृतीय क्रमांक पटकवला.
ही स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच आदर्श विद्यामंदिर, बदलापूर यांच्या सहकार्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली.
