ठाणे (25) – ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱी मतदान प्रक्रिया बिनचूक पध्दतीने व्हावी, यासाठी मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण शनिवारपासून होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
मतदान केंद्रावर नियुक्तीचे आदेश प्राप्त झालेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या 33 प्रभागात 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2, 3 यांना मतदान प्रक्रियेबाबत प्रथम प्रशिक्षण वर्ग दिनांक 27/12/2025 ते 29/12/2025 या तीन दिवसाच्या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दोन सत्रात आयोजित केले आहे. ठाणे शहरात एकूण 2013 इतकी मतदान केंद्रे असून या सर्व मतदान केंद्रासाठी 10120 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने संपूर्ण प्रशिक्षणाचा कार्यक्रम आखला असून यासाठी एकूण 2530 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकामधील एकूण 10120 अधिकारी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे दिनांक 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधील सकाळी 9 ते 12 व दुपारी 2 ते 5 या दोन सत्रात एकूण 4520 अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
तर डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे एकूण 5600 अशा एकूण 10120 अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी नमूद केले.
