चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी काळ्या फिती लावून सरकारचा केला निषेध
उरण दि २५ ( विठ्ठल ममताबादे ) : "सरकार हे सत्तापिपासू झाले आहे. सत्ताधारी फोडाफोडीच्या राजकारणात दंग झालेत. त्यांना सत्तेची नशा चढलीय. १९३० च्या जंगल सत्याग्रहाचा इतिहास उरणला आहे. १९८४ च्या लढ्याचे प्रणेते दि. बा. पाटील साहेब आहेत. त्या ऐतिसाहिक आंदोलनात पाच हुतात्मे झालेत. साडेबारा टक्केचा कायदा देशभर लागू झाला तो दिबांमुळेच, ओबीसी-मंडल आयोग लढ्याचे ते शिलेदार आहेत. तरीही आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव दिले जात नाही. त्यांच्या नावाबाबत जो सरकारचा बोलघेवडेपणा सुरू आहे, त्याबाबत सरकारचा तीव्र निषेध.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भूमिपुत्रांनी सत्ताधाऱ्यांना पहिला झटका द्यायला हवा.विमानतळाचे उदघाटन झाले, आजही विमानही उडाले, तरीही सरकार झोपेचे सोंग घेऊन आहे, याची जाण आता भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांना झाली आहे.भूमिपुत्रांच्या छाताडावर वसलेल्या विमानतळाला दिबांच्या नावाची सरकारला कशामुळे ऍलर्जी आहे. तीन वेळा आश्वासन देऊनही भूमिपुत्रांची सरकार चक्क फसवणूक करीत आहे. त्यामुळे बीजेपी सरकारला दणका देणे गरजेचे आहे.जोपर्यंत दिबांचे विमानतळाला नाव दिले जात नाही तोपर्यंत तरी दिबांचे पुत्र अतुल पाटील यांनी भाजपला लाथ मारायला हवी होती, पण ते त्यांना जमले नाही. सरकारने एकप्रकारे भूमिपुत्रांचा आता केसाने गळा कापला आहे, पण सर्वसामान्य जनता कोणत्याही क्षणी पेटून उठेल आणि सरकारला नेस्तनाबूत करेल, हे सरकारने लक्षात घ्यावे. त्यामुळे तातडीने दिबांचे नाव विमानतळाला द्या," असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले.
दिबांचे नाव विमानतळाला न दिल्याने चिंचपाडा येथे भूमिपुत्रांनी आज काळ्या फिती लावून सरकारचा निषेध केला, त्यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, निलेश पाटील, राजेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सरकारचा तीव्र शब्दांत निषेध केला.
