रायगड जिल्ह्यात करतात सर्वाधिक पोपटी.
विविध सामाजिक संस्था, संघटना एकत्र येत करतात पोपटी.
उरण दि ८(विठ्ठल ममताबादे ) : पोपटी म्हणजे हिवाळ्यात विशेषता कोकणात आयोजित केली जाणारी एक पारंपरिक मेजवानी आहे. ज्यात काळ्या मातीच्या भांड्यात किंवा पत्र्याच्या डब्यात वालाच्या शेंगा, वांगी, बटाटे, चिकन,अंडी आणि मसाले टाकून भांबुर्डीच्या पाल्यात किंवा केळीच्या पानात गुंडाळून जमिनीत किंवा शेकोटीत शिजवून गरमागरम खाल्ली जाते. जी थंडीच्या दिवसात निसर्गाच्या सानिध्यात मित्र-मैत्रिणींसोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
हिवाळ्याचा काळ म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी जेव्हा थंडी असते तेव्हा भाज्याही पिकतात, तेव्हा कोकणातील गावी शेतात मोकळ्या जागेत ही पोपटी शिजवली जाते. यामधील मुख्य घटक म्हणजे वालाच्या शेंगा, बटाटे, वांगी, मिरची, सुरण, अंडी, चिकन मसाले. या सर्व भाज्या आणि मसाले एकत्र करून एका मोठ्या भांड्यात ज्याला पोपटी म्हणतात भरले जातात आणि ते भांडे मातीमध्ये किंवा शेकोटीत गाडले जाते. त्यामुळे त्याला एक खास चव येते. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत निसर्गाच्या सानिध्यात एकत्र येऊन थंडीचा आस्वाद घेतला जातो.
पोपटी पार्टी हा कोकणातील खास रिवाज आहे जो हिवाळीतील थंडीचा आनंद घेण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने बनवलेल्या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आयोजित केला जातो. साधारणपणे डिसेंबर पासून पोपटी पार्टीच्या मेजवान्या रंगताना दिसून येतात. "पोपटी "या नावावरूनच या पार्टीचे वैशिष्ट्य ठरते. कोकणातील अनेक वर्षाची परंपरा आहे खरं तर या पार्टीचा मुख्य उद्देश म्हणजे ही पार्टी रात्री केली जाते. रात्री शेताची राखण करण्यासाठी जमलेले शेतकरी थंडीपासून वाचवण्यासाठी आणि जागे राहण्यासाठी विरंगुळा म्हणून ही पार्टी करत असत, पार्टीचे वैशिष्ट्य म्हणजे शेतात पिकणाऱ्या हंगामी भाज्यांचा वापर करून वापर करून मेजवानी केली जाते. भाज्या शेंगा भांबुर्डीचा पाला याचा वापर करून शेतकरी पोपटी करत असत, ही पिढ्यानपिढ्या चाललेली कोकणी परंपरा असून कुटुंब पाहुणे मित्र मंडळ या सर्वांना बोलावून अजूनही ती साजरी केली जाते. शेतात किंवा मोकळ्या जागेवर छान शेकोटी पेटवून धमाल गप्पा जुन्या आठवणी गाण्यांच्या मैफिली रंगून ही पार्टी साजरी करतात.
पोपटी शाकाहारी तसेच मांसाहारी हे दोन्ही प्रकारात केली जाते. हिवाळ्यात शेतात पिकणाऱ्या वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, रताळी ,वांगी, बटाटे इत्यादी पदार्थ एकत्र केले जातात जर मांसाहारी पोपटी करायचे असेल तर त्यात चिकनला मसाला लावून किंवा अंडी टाकून केळीच्या पानात बांधून टाकली जाते. त्यानंतर त्या मडक्यांचे तोंड पाण्याने झाकून उलटे ठेवले जाते. त्यानंतर आजूबाजूला गवत,शेणी आणि लाकडे लावून त्याची शेकोटी पेटवली जाते. ही पोपटी शिजायला अंदाजे अर्धा पाऊण तास लागतो. दरम्यान गप्पा रंगतात गाण्याच्या मैफिली रंगवल्या जातात ,थंडीच्या दिवसातच पोपटी पार्टी होत असल्याने कुटुंबातील लहान थोर पोपटीच्या शेकोटीजवळ शेक घेत बसतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपतात चरर असा आवाज झाला की पोपटी शिजली असे समजते.भांबुर्डे चा पाला व ओव्याचा भाजका असा खरपूस गंध पोपटीला असल्यामुळे आणि तेल व पाणी न वापरता केलेला पदार्थ असल्यामुळे पोपटी पचायला हलकी असते.त्यानंतर पोपटी शिजल्यानंतर मडके बाजूला काढून पोपटी मोठ्या परातीत काढून त्याच्यावर प्रत्येक जण ताव मारतो.
आधुनिक भाषेत बोलायला गेलो तर ही एक कॅम्प पद्धत आहे .थंडीच्या हंगामात कोकणात अनेक वर्षापासून चालत आली आहे .अंधारात निसर्गाच्या सानिध्यात अप्रतिम चवीच्या या गरमागरम पदार्थाचा आस्वाद घेण्याची मजा काही औरच असते. सर्वांना आवडणारी आणि प्रामुख्याने कोकणामध्ये बनणारी पोपटी उत्पन्नाचा उत्तम साधन होऊ शकते. परंतु अद्याप तिला व्यावसायिक स्वरूप येऊ शकले नाही ही खेदाची बाब आहे.उरण तालुक्यात आता थंडी मोठया प्रमाणात असून पोपटीची पार्टी सर्वत्र होताना दिसून येत आहे.
