ठाणे, दि. ०५ – जिल्हा परिषद ठाणेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या आनंददायी निवृत्ती वेतन योजना अंतर्गत एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आज, सोमवार दि. ०५ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद ठाणे येथील बी. जे. हायस्कूलच्या सभागृहात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात त्यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात तब्बल ३० ते ३५ वर्षांहून अधिक काळ प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विकासात मोलाचा वाटा उचलला असल्याचे त्यांनी नमूद केले. निवृत्तीनंतर आरोग्याची काळजी घेणे, छंद जोपासणे, सामाजिक व विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आयुष्याची नवी सकारात्मक सुरुवात करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे यांनी सांगितले की, ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करताना सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजात अमूल्य योगदान दिले आहे. प्रदीर्घ सेवा बजावलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवावृत्तीचे लाभ वेळेत मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव सातत्याने आढावा बैठका घेऊन विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियान तसेच १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला मिळालेले यश हे सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
या सन्मान सोहळ्यात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) देविदास महाजन, जिल्हा कृषी अधिकारी मुनीर बाचोटीकर, कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदिप पाटील, भाऊराव मोहिते, कनिष्ठ प्रशासन अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग) मनोज देवकर तसेच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांच्या शुभहस्ते एकूण १७१ सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय थोरात यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ३५ वर्षांच्या सेवाकाळात अनेक अनुभव आले. शिक्षण विभागातील विविध उपक्रम राबविताना सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेले सहकार्य अमूल्य असून जिल्हा परिषदेत काम करण्याचा आनंद आणि समाधान लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लघुटंकलेखक (उच्चश्रेणी), सहाय्यक प्रशासन अधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण), मुख्याध्यापक, ग्रामविकास अधिकारी, प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक, आरोग्य सेविका (महिला), आरोग्य सहाय्यक (पुरुष), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, औषध निर्माण अधिकारी, शिपाई, वाहन चालक व मैल कामगार आदी विविध पदांवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कृषी अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले तर सूत्रसंचालन विस्तार अधिकारी (शिक्षण) आशिष झुंजारराव यांनी केले.
