Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ग्रामपंचायत अंजूर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सखोल आढावा

अभियानांतर्गत झालेल्या विकासकामांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कौतुक

 ठाणे – आज, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी ग्रामपंचायत अंजूर येथे अचानक भेट देऊन “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” अंतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांचा व विकासकामांचा सखोल आढावा घेतला.

याप्रसंगी गटविकास अधिकारी (भिवंडी) गोविंद खामकर, ग्रामपंचायत अधिकारी अनिल गणेश कांगणे , सरपंच छाया शाम जनाठे, उपसरपंच हरेश मुरलीधर नाईक, ग्रामपंचायत सदस्य सुकेश डाकी, अविनाश दोडे, योगिता भोईर, ग्रामपंचायत कर्मचारी वृंद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

या भेटीदरम्यान अभियानाबाबतची सविस्तर माहिती ग्रामपंचायत अधिकारी अनिल गणेश कांगणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली. अभियानाचे मुख्य ७ घटक लक्षात घेऊन प्रत्येक घटकावर सविस्तर चर्चा करण्यात आली. अभियानाच्या कालावधीत ग्रामपंचायत अंजूर येथे राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समाधान व्यक्त करत विशेष कौतुक केले.

यावेळी उपस्थित ग्रामपंचायत समिती सदस्यांनी विविध नागरी व विकासात्मक समस्यांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे लक्ष वेधले. स्टेम प्राधिकरणांतर्गत मुख्य माणकोली ते अंजूर दरम्यान जलवाहिनी असून मुख्य रस्त्यालगत असलेल्या एस. एस. अपार्टमेंटमध्ये १२७ मिळकतधारक वास्तव्यास आहेत. मात्र, अंजूर येथील पाण्याच्या टाकीतून त्यांना पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याने मुख्य जलवाहिनीवरून टॅपिंग करून पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

तसेच ग्रामपंचायत कार्यालयासमोरील जागा व घर खरेदी करण्याबाबत परवानगी देण्यात यावी, तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी सर्व्हे नं. २२३ मधील ३० गुंठे जागेचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर जागा ग्रामपंचायतीला लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या.

याशिवाय ग्रामपंचायत अंजूर हद्दीतून जाणाऱ्या मुंबई–अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे गावातील मुलांसाठी असलेले एकमेव क्रिकेट मैदान बाधित झाले आहे. परिणामी आजतागायत मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नसून सर्व्हे नं. २२३ मध्ये क्रीडांगणाची तरतूद करून देण्याची मागणी ग्रामपंचायत समितीने केली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ज्या बाबींमध्ये अधिक गुण मिळू शकतात त्या बाबींवर विशेष लक्ष केंद्रित करून अभियानात जास्तीत जास्त गुण प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिल्या. तसेच घनकचऱ्याचे योग्य प्रकारे विलगीकरण करून खतनिर्मिती करावी, सुका कचरा रिसायकलिंगसाठी पाठवावा आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी शालेय आजी-माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून लोकसहभागाची चळवळ उभी करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

यानंतर ग्रामपंचायत अंजूर येथे मंजूर झालेल्या पंचायत प्रशिक्षण केंद्राची (PLC) पाहणी करण्यात आली. पंचायत प्रशिक्षण केंद्राचे सादरीकरण समाधानकारक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नमूद केले.

त्यानंतर ग्रामपंचायत अंजूर हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली व उपस्थित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


/
Design by - Blogger Templates |